दिल्ली - बीएड धारक शिक्षकांनाही आता प्राथमिक शाळांमध्ये नोकरी देण्यात येणार आहे. यापूर्वी केवळ डिएड डिप्लोमाधारक प्राथमिक शाळेतील शिक्षकाच्या नोकरीस पात्र होते. नॅशनल काऊंन्सील ऑफ टिचर्स एज्युकेशनने याबाबत नोटीस जारी केली आहे. त्यामध्ये पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांसाठी नवीन शैक्षणिक अर्हता आणि अटींबाबतची माहिती दिली आहे.
शाळेतील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे बीएडधारकांना दिलासा मिळाला आहे. पण, डीएडधारक उमेदवारांनी सरकाराच्या या निर्णयास आपला विरोध दर्शवला आहे. आजपर्यंत पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना केवळ डीएड पास उमेदवारच शिक्षक म्हणून विद्यादानाचे काम करत होते. मात्र, सरकारने शैक्षणिक धोरणात केलेल्या बदलानुसार आता बीएड पदवीधारकही शाळेत पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवतील. पण, यासाठी पात्र शिक्षकांना भरती झाल्यानंतर दोन वर्षाच्या आत सहा महिन्यांचा एक शॉर्ट टर्म कोर्स पूर्ण करावा लागणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे प्राथमिक शाळेत चांगले शिक्षक मिळतील. तसेच शाळेतील शिक्षणाचा दर्जाही सुधारेल, असे एनसीटीईचे म्हणणे आहे. दरम्यान, आजपर्यंत बीएडधारक केवळ माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्येच नियुक्त करण्यात येत होते.