ऑनलाइन लोकमत
मेरठ, दि. 26 - मेरठमधील एका रुग्णालयात आठवड्यातील सातही दिवस वेगवेगळ्या बेडशीट्स वापरल्या जातात. विशेष म्हणजे या सप्तरंगी रुग्णालयात कोणत्या रंगाची बेडशीट वापरायची हे त्या दिवशी कोणत्या देवाचा वार आहे यावरुन ठरवलं जातं. म्हणजे ज्या दिवशी हनुमानाचा वार असेल त्यादिवशी संपुर्ण रुग्णालयातील बेडशीट केशरी रंगाच्या असतात. त्याचप्रमाणे गुरुवारी साईबाबांचा वार असल्याने त्यादिवशी रुग्णालयीत बेडशीट पिवळ्या रंगाच्या असतात. रुग्णालयात एकूण 300 बेड आहेत.
पी एल शर्मा सरकारी रुग्णालयात हा अनोखा प्रकार चालू आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत "ऑपरेशन इंद्रधनुष्य" नावे या रुग्णालयात हे सप्तरंगी काम केलं जातं. सर्व रुग्णालयांना सात दिवस सात वेगवेगळ्या रंगाच्या बेडशीट्स वापरण्याचा आदेश आहे. या सात रंगांना देवी - देवतांशी संबंधित दिवसांच्या आधारे बदललं जातं. मेरठमध्ये रुग्णालय प्रशासनाकडून हिंदू देवी - देवतांना सामील करुन घेण्याच्या आदेशानंतर हे पाऊल उचलण्यात आलं.
जिल्हा रुग्णालयाचे मुख्य अधिक्षक डॉक्टर बन्सल यांनी सांगितलं की, "ऑपरेशन इंद्रधनुष्यसाठी 4900 बेडशीट्सची खरेदी करण्यात आली आहे. यासाठी तब्बल 12 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. स्वच्छ भारत अभियानांतर्गत ऑपरेशन इंद्रधनुष्यमध्ये आम्हाला आठवड्याच्या सातही दिवसांत वेगवेगळ्या रंगाच्या बेडशीट्स वापरण्याचा आदेश आहे. आम्ही इंद्रधनुष्यचा पॅटर्न फॉलो करण्याऐवजी हिंदू देवी, देवतांशी संबंधित रंग वापरण्याचा निर्णय घेतला".
पी एल शर्मा सरकारी रुग्णालयात दर दिवशी कोणता रंग वापरायचा हे ठरलं आहे. सोमवारी शंकराचा वार असल्याने सफेद, मंगळवारी नारंगी, बुधवार बुद्धाचा असल्याने हिरवा, गुरुवारी साईबाबांचा पिवळा आणि शनिवारी शनीदेवातशी संबंधित असल्याने निळ्या रंगाची बेडशीट वापरली जाते. शुक्रवार आणि रविवार कोणत्याही विशेष देवाशी जोडला गेल्या नसल्याने त्यादिवशी गुलाबी आणि वांगी रंगाच्या बेडशीट्स वापरल्या जातात.