ऑनलाइन लोकमत
तामिळनाडू, दि. 29- आयआयटी मद्रासच्या विद्यार्थ्यांनी कॉलेज कॅम्पसमध्ये बीफ महोत्सवाचं आयोजन केलं होतं. सरकारच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी या बीफ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. रविवारी संध्याकाळी ही घटना घडली आहे. बाजारात कत्तलीसाठीच्या जनावरांची खरेदी-विक्री करण्याच्या बंदीमागे गोमांसबंदीचा निर्णय अप्रत्यक्षपणे राबवण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप करत तसंच आपला निषेध नोंदविण्यासाठी आयआयटी मद्रासच्या विद्यार्थ्यांनी या महोत्सवाचं आयोजन केलं होतं. या बीफ महोत्सवाने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. बीफ महोत्सवात आयआयची मद्रासमधील 50 ते 60 विद्यार्थी सहभागी झाल्याची माहिती मिळते आहे.
"सरकारचा निर्णयाचा निषेध करण्यासाठी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे बीफ फेस्टिव्हला पाठिंबा दिला, कोणत्याही राजकीय पक्षाच्या सांगण्यावरून हे झालं नसल्याचं", आयआयटी मद्रासच्या विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे. काय खायचं हे निवडण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे, असं मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केलं आहे.
याआधी केरळमध्ये सार्वजनिक ठिकाणी गायीच्या वासराची कत्तल केल्याप्रकरणी सोमवारी युथ काँग्रेसच्या तीन कार्यकर्त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. भाजप युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी कन्नूर युथ काँग्रेसचे अध्यक्ष राजील माकुट्टी यांच्यासह तीन जणांविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत म्हटल्याप्रमाणे या तिघांनी गायीच्या एका वासराला सार्वजनिक ठिकाणी आणून त्याची कत्तल केली. त्यानंतर या वासराचं मांस लोकांना वाटण्यात आलं होतं. आठवडी बाजारात कत्तलीसाठी जनावरांची खरेदी आणि विक्री बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी त्यांनी हे कृत्य केलं होते. दरम्यान, काँग्रेसनेही या कृत्याचा निषेध करत कार्यकर्त्यांना निलंबित केलं आहे. हे कृत्य पूर्णपणे असमर्थनीय असल्याचं कॉँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवरून सांगितलं आहे.
आठवडी बाजारात दुभत्या जनावरांच्या खरेदी विक्रीवर पर्यावरण मंत्रालयाकडून बंदी टाकण्यात आली आहे. या निर्णयाचे पडसाद उमटायला सुरूवात झाली आहे. आम्ही काय खायचं हे दिल्ली आणि नागपुरकरांनी शिकवायला नको, अशा शब्दात केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. केरळमध्ये झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान बोलत असताना त्यांनी भाजपच्या निर्णयावर सडकून टीका केली. केंद्रात सत्तेत असणारं सरकार आपल्या भूमिका देशभरात लादू पहात आहे. मात्र केरळमधील लोकांच्या खाण्याच्या सवयी अतिशय चांगल्या असून दिल्ली आणि नागपूरमधून केरळी लोकांना खाण्याच्या बाबतीतले धडे देण्याची आवश्यकता नाही, असं विजयन यांनी सांगितलं आहे. केरळी लोक खाण्याच्या आरोग्यदायी आणि पोषणमूल्ये असणाऱ्या पारंपरिक पद्धती अवलंबतात, असंही विजयन पुढे म्हणाले आहेत.