ऑनलाइन लोकमत
तिरुवनंतपुरम, दि. 9- केंद्र सरकराने गुरांच्या खरेदी-विक्री संदर्भात काढलेल्या अध्यादेशाला सगळीकडून विरोध होतो आहे. विशेषकरून केरळमध्ये या निर्णयाचा मोठ्या प्रमाणात निषेध केला जातो आहे. केंद्राच्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी केरळ विधानसभेचं विशेष अधिवेशन गुरूवारी बोलवलं होतं. या अधिवेशनला केरळचे आमदार बीफ फ्राय खाऊन हजर झाले होते. बीफ फ्रायच्या पार्टीनंतर कत्तलखाने, गुरांची विक्री तसंच शेतकऱ्यांच्या समस्या या मुद्द्यावर केरळ विधानसभेत आमदारांनी चर्चा केली.
विधानसभेच्या सभागृहात जाण्यापूर्वी केरळचे सगळे आमदार कॅन्टीनमध्ये गेले. तिथे बीफ फ्रायच्या मेजवानीचं आयोजन केलं होतं. ‘रोज आम्ही सकाळी अकराच्या आधी ‘बीफ’ सर्व्ह करीत नाही. पण, अधिवेशनाचा विषय बीफ संबंधी होता. त्यामुळे आम्ही दहा किलो ‘बीफ’ची ऑर्डर दिली होती."अशी माहिती कॅन्टीनचालकांनी दिली आहे.
बाजारामध्ये कत्तलखान्यांना आणि कत्तलीसाठी गुरांची विक्री करण्यावर बंदी घालणारा अध्यादेश केंद्र सरकारने जारी केला आहे. या अध्यादेशाला ईशान्य भारतातील राज्य, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक यासारख्या राज्यांनी तीव्र विरोध केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विविध ठिकाणी लोकांनी तसंच काही राजकीय नेत्यांनी निदर्शन केली त्याचबरोबर बीफ फेस्टिव्हलचंही आयोजन झालं होतं. या सगळ्याला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. केरळमधील लोकांच्या यासंदर्भातील तक्रारींवर चर्चा करण्यासाठी विधानसभेचं अधिवेशन बोलविल आहे.
तिरुवनंतपुरमच्या देवीकुलमचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार एस. राजेंद्रन आधी ‘बीफ फ्राय’ खाऊन विधानसभेत आले होते. त्यानंतर कॅन्टिनमध्ये ‘बीफ’ उपलब्ध असल्याची बातमी सगळीकडे पसरली होती.