नवी दिल्ली - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये (UP Election 2022) भाजपला प्रचंड यश मिळाले. यानंतर पुन्हा एकदा योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथबद्ध होणार आहे. दुसऱ्यांदा युपीचा गड राखल्याने भाजपमध्ये आनंदाचे वातावरण असून, योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधीचा मेगा इव्हेंट होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. योगी आदित्यनाथ 25 मार्च रोजी लखनऊच्या एकना इंटरनॅशनल स्टेडियमवर दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधी सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. शपथविधीच्या आधी योगी आदित्यनाथांच्या बहिणीने इच्छा व्यक्त केली आहे.
"पंतप्रधान नरेंद्र मोदींची इच्छा असेल तर योगी एक दिवस पंतप्रधान होऊ शकतात" असं योगींच्या बहिणीने म्हटलं आहे. तसेच योगींच्या मेहुण्याने त्यांचा एक किस्सा देखील सांगितला आहे. योगी आदित्यनाथ यांची बहीण आणि त्यांचे मेहुणे योगींच्या शपथविधीच्या विषयावर 'टाइम्स नाऊ नवभारत' वाहिनीशी बोलत होते. याच दरम्यान पत्रकाराने त्यांची बहीण शशी सिंह यांना योगी आदित्यनाथ यांच्या पुढच्या वाटचालीसंदर्भात प्रश्न केला, तेव्हा त्यांनी सांगितले की, आता ते मुख्यमंत्री झाले आहेत आणि नरेंद्र मोदींची इच्छा असेल तर तेही पंतप्रधान होऊ शकतात. हे सर्व फक्त मोदींच्या हातात आहे, असंही म्हटलं आहे.
"मी असे काहीतरी करेन ज्यामुळे आपले नाव संपूर्ण जगात पोहोचेल"
योगी यांच्या मेहुण्याने सांगितले की, "आमच्या लग्नानंतर जवळपास 2 वर्षे ते आमच्यासोबत आहेत. यासोबतच त्यांनी सांगितले की, योगी आदित्यनाथ यांना काही चुकीच्या गोष्टींचा राग यायचा आणि ते आम्हालाही फटकारायचे. गावात आमच्याकडून कुठलीही चूक झाली तर ते रोखायचे. तसेच "आमचे लग्न झाले तेव्हा योगी आदित्यनाथ बीएससी करत होते. ते त्यांच्या अभ्यासात व्यग्र होते त्यामुळे आम्हाला त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवण्याची संधी मिळाली नाही. योगी आदित्यनाथ नेहमी म्हणायचे की तुम्ही ज्या गोष्टींमध्ये गुंतत आहात त्यामध्ये मी कधीही पडणार नाही. मी असे काहीतरी करेन ज्यामुळे आपले नाव संपूर्ण जगात पोहोचेल" असंही म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळ्यात योगगुरू बाबा रामदेव यांच्याशिवाय विविध मठ आणि मंदिरांचे महंतही उपस्थित राहणार आहेत. याशिवाय आघाडीचे उद्योगपती आणि ४९ कंपन्यांनाही निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. यामध्ये टाटा ग्रुपचे एन. चंद्रशेखरन, अंबानी ग्रुपचे नीरज अंबानी, महिंद्रा ग्रुपचे आनंद महिंद्रा, बिर्ला ग्रुपचे कुमार मंगलम बिर्ला आणि अदानी ग्रुपचे गौतम अदानी यांचाही समावेश असेल. मिळालेल्या माहितीनुसार, शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. आसाम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, उत्तराखंड, कर्नाटक, गुजरात, हरियाणा, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, मणिपूर आणि गोव्याचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी 200 व्हीव्हीआयपी पाहुण्यांची यादी तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, मुलायम सिंह यादव, बसपा सुप्रीमो मायावती यांच्यासह सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना निमंत्रित केले जाणार आहे.