अलिगडमधील टप्पल पोलीस स्टेशन परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर बुधवारी हृदयद्रावक अपघात झाला. यमुना एक्स्प्रेस वेवर झालेल्या या अपघातात उत्तराखंडचा प्रसिद्ध यूट्यूबर अगस्त्य चौहान याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अगस्त्य चौहान (२५) हा त्याच्या स्पोर्ट्स बाईकवरून आग्र्याहून दिल्लीला येत होता. दरम्यान, यमुना द्रुतगती मार्गावर त्याचं दुचाकीवरील नियंत्रण सुटलं आणि तो दुभाजकावर आदळला. या भीषण अपघातात अगस्त्यचा मृत्यू झाला.
अगस्त्यने यमुना एक्सप्रेसवेवर ३०० च्या वेगाने रेसिंग बाइक चालवत होता, यावेळी त्याचं बाईकवरील नियंत्रण सुटलं. यावेळी त्याची बाईक डिव्हायडरला धडकल्यानं अगस्त्यचा मृत्यू झाला. अगस्त्य दिल्लीत होणाऱ्या लाँग राईड स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जात होता. विशेष म्हणजे, अगस्त्य बाईक चालवताना व्हिडीओही बनवत होता. या व्हिडिओद्वारे पोलिसांना महत्वाची माहिती देखील हाती लागली आहे.
अगस्त्यने केलेल्या शेवटच्या व्हिडिओनूसार तो वारंवार त्याच्या आमिर नावच्या मित्रासोबत फोनवरुन बोलत होता. यावेळी त्यांना हेल्मेटबाबतही खुलासा केला. हेल्मेट त्रासदायक असल्याचं अगस्त्यने मित्राला सांगितले. बाइक ३००च्या वेगाने चालवल्यास हेल्मेट उडून जाईल, असा अंदाज देखील अगस्त्यने मित्रासोबत फोनवर बोलताना केला. तसेच बाइकला नियंत्रित आणण्यासाठी २०० ते ३०० मीटर आधीच ब्रेक दाबायला लागेल, असं अगस्त्य मित्राला म्हणाला. आग्र्याहून दिल्लीला येत असताना अगस्त्यने यमुना एक्स्प्रेस वेवर दुचाकी २९४ च्या वेगानं चालवल्याची माहिती देखील पोलिसांना व्हिडिओद्वारे मिळाली आहे.
दरम्यान, अगस्त्य चौहान हा मूळचा डेहराडून, उत्तराखंडचा. त्याच्या युट्यूब चॅनेलचं नाव PRO RIDER 1000 आहे. या चॅनलचे १२ लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. अगस्त्य चौहान यानं मृत्यूच्या अवघ्या 16 तास आधी शेवटचा व्हिडीओ अपलोड केला होता. ज्यामध्ये तो मित्रांसोबत लवकरच दिल्लीला पोहोचणार असल्याचं लिहिलं होतं. दिल्लीत होणाऱ्या लाँग राईड स्पर्धेसाठी अगस्त्य चौहान रवाना झाला होता. त्यानं त्याची ZX कावासाकी बाईकसुद्धा बदलून घेतली. बाईक चालवतानाही अगस्त्य चौहान युट्यूब चॅनलसाठी व्हिडीओ शूट करायचा.