पंजाब, हरियाणाची राजधानी चंदीगढमध्ये महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीपूर्वी निवडणूक अधिकारीच अचानक आजारी पडल्याची घटना घडली आहे. यामुळे निवडणूक टाळण्यात आली आहे.
या संदर्भात चंदीगढच्या सर्व नगरसेवकांना निवडणूक अधिकारी अनिल मसिह हे आजारी असल्याचे व्हॉट्सअपवरून कळविण्याच आले आहे. यामुळे काँग्रेस आणि आपच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या कार्यालयाबाहेर जोरदार गोंधळ घातला. निवडणूक प्रक्रिया ११ वाजता सुरु होणार होती, त्यापूर्वीच हा प्रकार घडला आहे.
पराभूत होणार असल्याने भाजपा निवडणूक रद्द करू इच्छित असल्याचा आरोप या दोन्ही पक्षांनी केला आहे. काँग्रेसचे माजी खासदार पवन बन्सल यांनी या संपूर्ण प्रकरणाबाबत न्यायालयात जाणार असल्याचे म्हटले आहे. तसेच आपचे खासदार राघव चड्ढा यांनी इंडिया आघाडीकडे बहुमत आहे, पराभवाच्या भीतीने भाजपा पळत आहे असा आरोप केला आहे.
चंदीगड महापौरपदाची निवडणूक जिंकण्यासाठी 19 मतांची आवश्यकता आहे. काँग्रेस आणि आप एकत्र आल्याने त्यांची २० मते झाली आहेत. तर भाजपाकडे १५ मते आहेत. यात खासदार किरण खेर यांचेही मत आहे. आज मते फुटली नसती तर आघाडीचा विजय होणार होता. परंतु, निवडणूक अधिकारीच आजारी पडल्याने निवडणूक टाळण्यात आली आहे.
भाजप नेते आणि माजी महापौर अनुप गुप्ता यांनी प्रत्यूत्तर दिले आहे. आमचे सर्व नगरसेवक मतदानासाठी एकत्र आले होते. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आहे, सर्व अधिकारीही त्यांचेच आहेत, मग आम्ही निवडणुका कशा रोखू शकतो असा सवाल त्यांनी केला आहे.