लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने महागाईने पिचलेल्या महिलांना आपल्या बाजुने करण्यासाठी मोठा डावपेच आखला आहे. गॅस सिलिंडरची किंमत कमी करण्याचे तसेच होळी आणि दिवाळी असे वर्षाला दोन गॅस सिलिंडर मोफत देण्याचे मुद्दे येत्या काही महिन्यांत पेरले जाणार आहेत. याचबरोबर भाजपाने दलित आणि महिलांमध्ये व्होटबँक साधण्याचा प्लॅन आखला आहे. सुरुवातीला उत्तर प्रदेश भाजपाच्या या प्लॅनमध्ये आहे.
नरेंद्र मोदी हे गॅस सिलिंडर, पेट्रोल-डिझेलचे वाढलेले दरांवर राजकारण करून सत्तेत आले होते. परंतू, त्यानंतर गॅस सिलिंडर आणि इंधनाच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. महागाई देखील आवासून उभी आहे. असे असताना आता पुन्हा लोकसभा निवडणूक लागणार आहे. यामुळे मोदी सरकारने गेल्या महिन्यापासून गॅस सिलिंडरचे दर कमी करून महिलावर्गातील राग शांत करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात मोठे राज्य आहे, तसेच हे राज्य जो जिंकतो त्याला देशात सत्ता आरामात काबीज करता येते. कारण तिथे ७२ खासदार आहेत.
११०० रुपयांना मिळणारा गॅस सिलिंडर आता ९०० रुपयांना मिळत आहे. तर उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना हा गॅस सिलिंडर ६०३ रुपयांना मिळत आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारने वर्षाला दोन सिलिंडर मोफत देण्याची तयारी सुरु केली आहे. या दिवाळीपासून दर दिवाळी आणि होळीला हा गॅस सिलिंडर मोफत दिला जाणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये या योजनेचे १.७५ कोटी लाभार्थी आहेत.
नारी शक्ती वंदन कायद्यांतर्गत महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी पक्ष परिषदेचे आयोजन करत आहे. पक्षाचे सरचिटणीस संघटना धर्मपाल सिंह यांनी सर्व जिल्हाप्रमुखांना हा मुद्दा जनतेसमोर ठेवण्यास सांगितले आहे.