लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली असतानाच काँग्रेसचं बळ वाढवणारी घटना घडली आहे. बिहारमधील नेते पप्पू यादव यांनी त्यांचा जन अधिकार पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला आहे. पप्पू यादव यांनी आज दुपारी काँग्रेसच्या मुख्यालयामध्ये आपल्या पक्षातील इतर नेत्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी काँग्रेसचे नेते पवन खेडा यांच्यासह इतरांनी पप्पू यादव यांचं पक्षामध्ये स्वागत केलं.
पप्पू यादव यांनी मंगळवारी बिहारची राजधाना पाटणा येथे आरजेडीचे प्रमुख लालूप्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांची भेट घेऊन त्यांच्याशी चरर्चा केली होती. त्यानंतर भाजपाला रोखण्यासाठी आम्ही तयारी करत आहोत, असे पप्पू यादव यांनी सांगितले होते. पप्पू यादव हे बिहारमधील पूर्णिया मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. तसेच या मतदारसंघातून ते विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. लालू प्रसाद यादव यांची काल भेट घेतल्यानंकर पप्पू यादव हे आज दिल्लीत आले. तिथे आज दुपारी त्यांच्या पक्षाचं अधिकृतरीत्या काँग्रेसमध्ये विलिनीकरण झालं. तसेच त्यांना काँग्रेसचं सदस्यत्व देण्यात आलं.
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याशी झालेल्या सल्लामसलतीनंतर पप्पू यादव यांनी त्यांच्या पक्षाचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण करण्याचा निर्णय घेतला, असे त्यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी सांगितले. दरम्यान, मी आणि तेजस्वी यादव मिळून नितीश कुमार आणि नरेंद्र मोदी यांना पराभूत करू, असा दावाही पप्पू यादव यांनी केला.
दरम्यान, पप्पू यादव यांची पत्नी रंजित रंजन ह्या काँग्रेसच्या राज्यसभा खासदार आहेत. त्याआधी त्या सुपौल लोकसभा मतदारसंघातील खासदार होत्या. मागच्या काही दिवसांपासून पप्पू यादव यांची काँग्रेसची जवळीक वाढत असल्याचे वृत्त आले होते. मात्र त्यांच्या उमेदवारीबाबत आरजेडीकडूनही मान्यता मिळणे आवश्यक असल्याने हा पक्षप्रवेश रखडला होता. अखेर लालूप्रसाद यादव यांच्याशी चर्चा केल्यानंतर पप्पू यादव यांच्या काँग्रेसमध्ये प्रवेश करून निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला.