जम्मू: रस्त्यावर राहणाऱ्या एका महिला भिकाऱ्याकडे पालिका कर्मचाऱ्यांना मोठी रोख रक्कम सापडली आहे. भिकाऱ्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी पालिकेनं मोहीम हाती घेतली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून शहरातील भिकाऱ्यांना निवारा केंद्रात हलवण्याचं काम सध्या सुरू आहे. त्यावेळी एका ६५ वर्षीय भिकारी महिलेकडे सापडलेली रोख रक्कम पाहून पालिका कर्मचाऱ्यांना धक्काच बसला. या महिलेला राजौरी जिल्ह्यातील निवारा केंद्रात हलवण्यात आलं आहे.बस स्थानक परिसरात असलेल्या रस्त्यावर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना एक महिला फिरताना दिसली. ही महिला तीन दशकांपासून याच परिसरात रस्त्याच्या कडेला राहते. सोमवारी तिला निवारा केंद्रात हलवण्यात आलं, अशी माहिती नौशेराचे अतिरिक्त उपायुक्त सुखदेव सिंग सम्याल यांनी दिली. 'महिलेला सोमवारी निवारा केंद्रात आणल्यानंतर मंगळवारी पालिकेचे कर्मचारी ती राहत असलेलं रस्त्याच्या कडेला असलेलं लहानसं छप्परा तोडण्यास गेले. त्यावेळी त्यांना तिथे तीन प्लास्टिकचे डबे आढळून आले. त्यात पॉलिथिनच्या पिशव्या होत्या. त्यात बऱ्याचशा नोटा होत्या. यासोबतच ज्युटची पिशवी होती. त्यामध्ये बरेचशी नाणी होती,' असं सम्याल यांनी सांगितलं.घटनेची माहिती मिळताच तिथे पोलीस कर्मचारीदेखील दाखल झाले. महिलेनं ठेवलेले पैसे मोजण्याचं काम कित्येक तास सुरू होतं. ही रक्कम २ लाख ५८ हजार ५०७ रुपये इतकी होती. एका पेटीत ही रक्कम ठेवण्यात आली होती. आज ती भिकारी महिलेला देण्यात येणार आहे, असं सम्याल म्हणाले. भिकारी महिला मूळची कुठली आहे याची माहिती आसपास राहणाऱ्या कोणाकडेच नाही. पण तिनं प्लास्टिकच्या बॉक्समध्ये तिचे पैसे साठवून ठेवले होते. ही संपूर्ण रक्कम आता तिच्या ताब्यात दिली जाणार आहे.
भिकारी महिलेकडे 'घबाड' सापडले; पालिकेचे कर्मचारी पैसे मोजून मोजून दमले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2021 12:43 PM