मुंबई - उडपी-चिक्कमगलुरू लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्याखासदार शोभा कंरदलाजे यांच्या बँक अकाऊंटमधून 15 लाख रुपये काढून घेण्यात आल्याच धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याबाबत खासदार शोभा यांनी आपले बँक अकाऊंट हॅक झाल्याची तक्रार दिली आहे. तर माझ्या अकाऊंटमधून 15 लाख रुपये कमी झाल्याचा मेसेजही मला आला नसल्याचे शोभा यांनी म्हटले आहे. याबाबत माहिती होताच, काँग्रेस नेत्यांंनी मोदींची खिल्ली उडवताना, आता लोकांची सहनशिलता संपली असून 15 लाख काढून घ्यायची सुरुवात झाल्याचं काँग्रेस नेते प्रियांक खर्गे यांनी म्हटलं आहे.
शोभा करंदलजे यांनी आपले सॅलरी अकाऊंट अपडेट करण्यासाठी पासबुक बँकेत नेले होते, त्यावेळी हे पैसे आपल्या बँक अकाऊंटमधून वजा झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. नवी दिल्लीतील बँक ऑफ इंडिया शाखेतील अकाऊंटमधून गेल्या दोन महिन्यात ही रक्कम काढून घेण्यात आली आहे. याप्रकरणी शोभा यांनी पार्लमेंट रस्त्यावरील पोलीस स्थानकात जाऊन तक्रार दाखल केली आहे. अकाऊंटमधून काढून घेण्यात आलेली रक्कम अंदाजे 15.62 लाख रुपये असल्याची माहिती आहे.
याबाबत तपास सुरू असून सायबर गुन्हे शाखेकडूनही चौकशी सुरु आहे. तर संबंधित बँकेकडून अकाऊंटसंबंधित डिटेल्स मागविण्यात आल्याचेही तपास अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. दरम्यान, याप्रकरणी काँग्रेस नेते प्रियांक खर्गे यांनी ट्विट करुन मोदींना लक्ष्य केलं आहे. मोदींनी प्रत्येक भारतीयांच्या अकाऊंटमध्ये 15 लाख रुपये जमा करण्याचं सांगितलं होतं. मात्र, आता लोकांची सहशक्ती संपली असून, याची सुरुवात कर्नाटकमधील भाजपाच्या आमदारापासून झाल्याचं म्हणत उपरोधात्मक टीका केली आहे. तसेच, सायबर गुन्हेगारीला केंद्रस्थानी ठेवून सरकार पाऊलं उचलेल, अशी अपेक्षाही खर्गे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन व्यक्त केली आहे.