भोपाळ : विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना भाजपाने मध्य प्रदेशातील मंदिरे, हिंदू धर्मगुरु, सामाजिक संघटना आणि समाजातील प्रभावशाली व्यक्तींची माहिती गोळा करण्याचे काम हाती घेतले आहे. बुथ पातळीवर पक्षाचे कार्यकर्ते यासाठी झटत आहेत.परंतु ही माहिती नेमकी कशासाठी गोळा केली जात आहे, याचा हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. राज्यात भाजपात सलग तिसऱ्यांदा सत्तेत आहे आणि शिवराज सिंह चौहान मुख्यमंत्री पद भूषवित आहेत.भाजपा प्रवक्ते रजनीश अग्रवाल यांनी सांगितले की, हो, आम्ही मंदिरे, मठ, त्यांचे प्रमुख, धर्मगुुरु याची माहिती गोळा केली आहे. पक्षाकडून बुथ पातळीवर सामाजिक संस्था आणि समाजातील प्रभावी लोकांची यादी तयार केली जात आहे.परंतु या माहितीचे पक्ष नेमके काय करणार आहे, हे सांगण्यास मात्र अग्रवाल यांनी नकार दिला. ते म्हणाले की, आम्ही त्यांच्याशी संपर्क करणार आहोत हे नक्की. परंतु तो कधी आणि यामागे नेमका काय हेतू असेल याबाबत आम्ही आता काहीही सांगणार नाही.आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाची कामगिरी फारशी चांगली असणार नाही, अशी चर्चा आहे. या आॅगस्ट महिन्यात पक्षाने जनमतचाचणी घेतली होती. आता पक्षाने माहिती संकलनावर लक्ष केंद्रीत केले आहे. (वृत्तसंस्था)मुख्यमंत्री चौहान यांचे काँग्रेसमध्ये स्वागतमध्य प्रदेशातील काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ यांच्या कामाचे भाजपाचे माजी मुख्यमंत्री बाबुलाल गौर यांनी कौतुक केल्यानंतर गौर काँग्रेसमध्ये जाणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र, केवळ गौरच का? मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचेही काँग्रेसमध्ये स्वागत आहे, असा टोला कमलनाथ यांनी लगावला.
भाजपाकडून मंदिरे, धर्मगुरू, सामाजिक संस्थांची माहिती जमविण्यास सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2018 2:21 AM