पाटणा: आपल्याला कोणतीही माहिती हवी असल्यास आपण गुगलकडे जातो. कोणत्याही विषयाबद्दलची योग्य माहिती मिळवण्यासाठी आपण गुगलची मदत घेतो. पण बिहारमधल्या एका तरुणानं चक्क गुगलचीच चूक शोधून काढली आहे. त्यानंतर गुगलनं त्याचा सन्मान केला. हॉल ऑफ फेम पुरस्कारानं गुगलनं तरुणाला गौरवलं आहे.
बिहारच्या बेगुसरायमध्ये वास्तव्यास असलेल्या ऋतुराज चौधरीनं सर्वात मोठं सर्च इंजिन असलेल्या गुगलची चूक शोधून काढली. या चुकीचा फायदा ब्लॅक हॅट हॅकरला घेता आला असता. ऋतुराजनं गुगलला त्यांची चूक सांगितली. त्याबद्दलची तपशीलवार माहिती पाठवली. साईटवर मोठी चूक झाल्याचं यानंतर गुगलच्या लक्षात आलं. त्यांनी १९ वर्षीय ऋतुराजचं कौतुक केलं आणि त्याचा समावेश हॉल ऑफ फेम केला. ऋतुराजचा समावेश गुगलनं त्यांच्या संशोधकांच्या यादीतदेखील केला आहे.
ऋतुराज चौधरी आयआयटी मणिपूरमधून बीटेक करत आहे. तो सध्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. सायबर सुरक्षेवर त्याचा स्वतंत्र अभ्यास सुरू आहे. सध्या तो बग हंटिंगच्या पी-२ टप्प्यात आहे. तो पी-० टप्प्यावर पोहोचल्यावर गुगल त्याला खास बक्षीस देणार आहे. ऋतुराज करत असलेल्या संशोधनाबद्दल त्याच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला. ऋतुराजचे वडील राकेश कुमार चौधरी व्यवसायिक आहेत.
गुगल मोठं सर्च इंजिन आहे. पण ब्लॅक हॅट हॅकर्स एका माध्यमातून साईटवर हल्ला करू शकतात. याबद्दलचीच माहिती गुगलला मी दिली होती, असं ऋतुराजनं सांगितलं. ऋतुराजला लहानपणापासूनच सायबर सुरक्षेत रस आहे. त्याला शाळेत मित्र हॅकर हॅकर म्हणून चिडवायचे. याची माहिती वडिलांना समजताच ते नाराज झाले. मात्र हॅकिंग चांगल्या कामांसाठीही वापरलं जात ही गोष्ट त्यानं वडिलांना समजावली. त्यानंतर वडिलांचा गैरसमज दूर झाला.