नवी दिल्ली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सावरकर आणि महात्मा गांधी यांच्यासंदर्भात केलेल्या एका वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादानंतर, आता इतिहासकार विक्रम संपत यांनी यासंदर्भात पुरावा दिला आहे. एवढेच नाही, तर त्यांनी पुस्तकातील काही पानंही शेअर केली आहेत. ज्यावरून महात्मा गांधी यांनी सावरकरांना दया याचिका दाखल करण्यासाठी सांगितले होते, हे स्पष्ट होते. संपत यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यानंतर उपस्थित करण्यात येत असलेल्या प्रश्नांना पुराव्यांसह उत्तर दिले आहे.
गांधी सेवाग्राम आश्रमाच्या वेबसाइटवर महात्मा गांधी यांच्या कामांसंदर्भात देण्यात आलेल्या माहितीचे कलेक्शन (Gandhi Literature: Collected Works of Mahatma Gandhi)मध्ये महात्मा गांधींनी एनडी सावरकर अर्थात सावरकरांच्या भावाला लिहिलेल्या पत्राचा उल्लेख आहे. महात्मा गांधींचे हे पत्र ‘कलेक्टेड वर्क्स ऑफ महात्मा गांधी’च्या व्हॉल्यूम 19 मधील पान क्रमांक 348 वर आहे.
या पत्रात महात्मा गांधी यांनी एनडी सावरकरांना लिहिले आहे, की ‘प्रिय सावरकर, माझ्याकडे आपले पत्र आहे. आपल्याला सल्ला देणे कठीण आहे. पण, माझा सल्ला आहे, की आपण प्रकरणाची वस्तुस्थिती स्पष्ट करत एक संक्षिप्त याचिका तयार करा, ज्यातून हे स्पष्ट होऊ शकेल, की आपल्या भावाने केलेला गुन्हा हा पूर्णपणे राजकीय होता. या प्रकरणाकडे जनतेचे लक्ष आकर्षित करता यावे यासाठी मी हा सल्ला देत आहे. दरम्यान, मी आपल्याला आधीच्या पत्रात म्हटल्याप्रमाणे, या प्रकरणात मी, आपल्या पद्धतीने पुढे पावले टाकत आहे.’
यानंतर महात्मा गांधींनी या प्रकरणाला मुद्दा बनविण्यासाठी ‘यंग इंडिया’मध्ये 26 मे 1920 रोजी एक लेखही लिहिला होता. इतिहासकार विक्रम संपत यांचे म्हणणे आहे, की जेव्हा गांधींचे पत्र आधीपासूनच उपलब्ध आहे, तर मग राजनाथ सिंह यांच्या या वक्तव्यावर एवढा बवाल कशासाठी आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये सर्व पुरावे देत लिहिले आहे, की ‘मला आशा आहे, की गांधी आश्रमाने या पत्रांना चुकीच्या पद्धतीने सादर केले आहे, असे आपण म्हणणार नाही.'
सावरकरांसंदर्भात काय म्हणाले होते, राजनाथ सिंह?राजनाथ सिंह उदय माहूरकर आणि चिरायू पंडित यांच्या ‘वीर सावरकर हु कुड हॅव प्रीव्हेंटेड पार्टिशन’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात म्हणाले होते, महात्मा गांधींच्या सांगण्यावरूनच तुरुंगात असताना सावरकरांनी इंग्रजांना दया याचिका लिहिली होती. ते म्हणाले, सावरकरांसंदर्भात विविध प्रकारच्या खोट्या गोष्टी पसरवल्या गेल्या. म्हटले गेले, की सावरकरांनी इंग्रजांकडे अनेक वेळा दयेसाठी याचिका लिहिल्या होत्या. मात्र, सत्य तर असे आहे, की सावरकरांनी महात्मा गांधींच्या सांगण्यावरूनच दया याचिका दाखल केली होती.