नवी दिल्ली : सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच पहलाज निहलानी यांनी जारी केलेली निषिद्ध शब्दांची वादग्रस्त यादी सदस्यांच्या प्रखर विरोधानंतर बोर्डाने अखेर मागे घेतली आहे. शुक्रवारी मुंबईत झालेल्या सेन्सॉर बोर्डाच्या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली आणि चित्रपटांत वापरण्यास बंदी घालावयाच्या शब्दांची यादी मागे घेण्याचे बहुमताने ठरविण्यात आले. या शब्दांवर बंदी घालण्याऐवजी चित्रपटाच्या संदर्भात ते पडताळून पाहिले जावेत, असे सर्वानुमते ठरले.बोर्डाच्या एका सदस्याने सांगितले की, बहुतांश सदस्यांनी यादी रद्द करण्याच्या बाजूने विचार व्यक्त केले आणि अखेर बहुमताने निर्णय घेण्यात आला. चित्रपटांत उपयोगात न आणण्याच्या आक्षेपार्ह आणि अवमानास्पद शब्दांची यादी वितरित करण्यात आली होती. परंतु बोर्डाने तिची अंमलबजावणी थांबवण्याचा निर्णय घेतला. या यादीमुळे मोठा वाद निर्माण झाला होता व या विषयावर आणखी विचारमंथन व्हायला पाहिजे, असे मत व्यक्त करण्यात येत होते. या यादीला चित्रपट निर्मात्यांनी तर प्रखर विरोध केला होताच पण माहिती व प्रसारण खातेही या यादीवर फारसे खूष नव्हते. चित्रपटांना लवकरात लवकर सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र मिळावे, यासाठीच्या तत्काल योजनेवरही या बैठकीत चर्चा झाली.कोणते शब्द होते यादीत?हरामजादा, हरामी, हराम का पिल्ला, हराम का जाना, कुतिया, साली. याशिवाय महिलांबाबत अवमानकारक, गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारे, द्वैअर्थी शब्दही वापरण्यास बंदी घातली होती.
सेन्सॉरची ‘त्या’ शब्दांची यादी मागे
By admin | Published: August 02, 2015 2:23 AM