ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. ३० -भारतात सम लैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणाारा भारतीय दंड विधानातील कलम ३७७ रद्द होऊ शकतो असे संकेत कायदामंत्री सदानंद गौडा यांनी दिले आहे. समलैंगिक विवाहांना मान्यता देण्याच्या कायद्यावरही विचारविनिमय होऊ शकतो असेही त्यांनी म्हटले आहे.
अमेरिकेत समलैंगिक विवाहांना संमती देणारा कायदा मंजूर झाल्यावर भारतानेही यावर विचार करावा अशी मागणी समलिंगींसाठी काम करणा-या संस्थांकडून होत होती. सोशल मिडीयावरही अनेकांनी या निर्णयाचे समर्थन केले होते. याविषयी कायदामंत्री सदानंद गौडा यांना प्रश्न विचारला असता गौडा म्हणाले, अमेरिकेनंतर भारतातही अनेक जण याचे समर्थन करत आहेत. आम्ही सर्वबाजूंनी सखोल विचार केल्यानंतरच यावर अंतिम निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले. राज्यसभेत डीएमकेचे खासदार तिरुची शिवा यांनी ट्रान्सजेंडर्सच्या हक्कासंदर्भात एक विधेयक मांडले आहे, हे विधेयक राज्यसभेत मंजूर झाले असून लोकसभेतही विधेयक मंजूर झाल्यास कलम ३७७ चे महत्त्व उरणार नाही असेही गौडा यांनी सांगितले.
भारतीय दंड विधानातील कलम ३७७ नुसार अनैसिर्गक संबंध ठेवणे हा गुन्हा असल्याने देशात समलैंगिक संबंध हा गुन्हा ठरतो. हा कलम रद्द करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. गौडा हे दक्षिण कन्नड जिल्ह्यातून संसदेत निवडून आले असून संघाचा या जिल्ह्यावर चांगलाच प्रभाव आहे. संघाने समलिंगी संबंधांना नेहमीच कडाडून विरोध केला असतानाच गौडा यांनी मांडलेले मत हे महत्त्वाचे ठरते असे जाणकारांचे म्हणणे आहे.