नवी दिल्ली : 1999 च्या उन्हाळ्याआधी बेनझीर भुत्ताे पंतप्रधान असताना पाकिस्तानच्या सैन्याने भारताविरुद्ध कारगिलसारख्या कारवाईची योजना आखली होती; परंतु त्याला भुत्ताे यांनी प्रखर विरोध केला होता, असे एका माजी मुत्सद्याने आपल्या नव्या पुस्तकात म्हटले आहे.
1992 ते 1994 या काळात कराचीत भारताचे महावाणिज्य दूत राहिलेले राजीव डोग्रा यांनी ‘व्हेअर बॉर्डर्स ब्लीड : अॅन इनसायडर्स अकाऊंट ऑफ इंडो-पाक रिलेशन्स’ या पुस्तकात भारत-पाक संबंधांवर प्रकाश टाकला आहे. यात त्यांनी या काळातील अनेक वादग्रस्त मुद्यांवर भाष्य केले आहे.
बेनझीर भुत्ताे या सुस्वभावी आणि मवाळ प्रवृत्तीच्या होत्या आणि पश्चिमेत शिक्षण घेतल्यामुळे त्या बाह्य जगासोबतच्या संबंधाबाबत ग्रहणशील होत्या. त्या सैन्य योजनेच्या विरोधात अगदी ठामपणो उभ्या राहिल्या, असे डोग्रा यांनी म्हटले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
कारगिलसारखी लष्करी कारवाई करण्याची तत्कालीन डीजीएमओ मेजर जनरल परवेज मुशर्रफ यांची संकल्पना बेनझीर यांनी कशी मोडीत काढली हे डोग्रा यांनी बेनझीर यांच्याच एका मुलाखतीचा हवाला देत स्पष्ट केले आहे. ऐतिहासिक दिल्ली-लाहोर बसमध्ये बसून प्रवास केल्याबद्दल तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे स्वागत करणारे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना पाकिस्तानी सैनिकांनी कारगिलच्या शिखरांवर कब्जा केल्याचे ठाऊक होते, असा दावा डोग्रा यांनी केला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
———————
मुंबई बॉम्बस्फोट मालिकेला शरीफ यांची मंजुरी
‘पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेबाबत आधीपासूनच माहिती होती आणि त्यासाठी त्यांनी आपली मंजुरीही दिली होती. पाकच्या सर्वोच्च न्यायालयाच्या एका माजी न्यायाधीशाने 1994 मध्ये कराची येथे याबाबत मला सांगितले होते. मुंबईतील बॉम्बस्फोट मालिका पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या मंजुरीनेच घडवून आणण्यात आली असल्याचे त्यांनी मला दबक्या आवाजात सांगितले,’ असा दावा राजीव डोग्रा यांनी केला आहे.