नवी दि्ल्ली - पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ३१ मार्चपर्यंतच लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे योजनेसाठी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची मोठी धावपळ सुरू आहे. परंतु, ही योजना बंद होणार असल्याने घरकुलाचे स्वप्न पाहणारे अनेकजण वंचित राहणार आहेत.
२०२२ पर्यंत सर्वांना हक्काचे घर मिळावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून शहरी, ग्रामीण भागासाठी पंतप्रधान आवास योजना राबविण्यात आली आहे. या योजनेंतर्गत सबसिडी मिळू लागल्याने जिल्ह्यातील हजारो नागरिकांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण झाले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजही अनेकजण उत्सुक आहेत. परंतु, ही योजनाच मार्चअखेरीस संपणार असल्याने या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे.
२० मार्चपर्यंत येणाऱ्या प्रस्तावाला मिळणार मान्यता
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत अनुदानाचा लाभ घेण्यासाठी रितसर प्रस्ताव शासनाकडे सादर करणे गरजेचे आहे. २० मार्चपर्यंत येणाऱ्या प्रस्तावांना शासनाकडून मंजुरी दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
कोणाला कशी मिळते सबसिडी
सहा लाख रूपये वार्षिक उत्पन्नावर ६.५ चे क्रेडिट लिंक्ड सबसिडी आहे. १२ लाख उत्पन्नावर ९ लाखांच्या कर्जावर ४ टक्के व्याज सबसिडी, १८ लाख उत्पन्नात १२ लाखांपर्यंतच्या कर्जावर ३ टक्के व्याज सबसिडी मिळू शकते.
योजना सुरूच राहायला हवी
पंतप्रधान आवास योजनेतून मिळणाऱ्या सबसिडीचा गरजू नागरिकांना मोठा लाभ होतो. ही योजना बंद झाली तर अनेकांचे नुकसान होणार आहे. हे नुकसान होऊ नये म्हणून ही योजना गरजूंसाठी सुरू राहणे गरजेचे आहे. - सुजित सोनवणे
पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून अनेकांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण झाले आहे. या योजनेमुळे अनेकांनी घरकुलाचे प्रस्ताव प्रस्तावित केले आहेत. गरजूंसाठी महत्त्वाची असलेली योजना शासनाने बंद करू नये. - कैलास टेकाळे