नवी दिल्ली – कोरोना व्हायरसमुळे अनेक जण नोकऱ्या गेल्याने बेरोजगार झालेत. या युवकांसाठी केंद्र सरकारनं मोठा दिलासा दिला आहे. अटल विमा कल्याण योजनेंतर्गत सवलतीत वाढ करण्याच्या निर्णयाला सरकारने अधिसूचित केले आहे. या योजनेचा लाभ घेण्याचा कालावधी सरकारने कालावधी ३० जून २०२१ पर्यंत वाढविला आहे. याचा लाभ कर्मचारी राज्य विमा कॉर्पोरेशन (ESIC) मध्ये नोंदणीकृत कामगारांना ५० टक्के बेरोजगारीचा लाभ मिळेल. सरकारच्या या निर्णयाचा ४० लाखाहून अधिक कामगारांना फायदा होणार आहे.
या लोकांना योजनेचा लाभ मिळेल
अटल विमा कल्याण योजनेंतर्गत ज्या कर्मचाऱ्यांचे रोजगार गेले आहेत अशांना शासनाकडून आर्थिक मदत मिळते. हा एक प्रकारचा बेरोजगारी भत्ता आहे, ज्याचा फायदा ESI योजनेत समाविष्ट असलेल्या कर्मचार्यांनाच होतो. म्हणजेच ईएसआयचे योगदान त्यांच्या मासिक पगारामधून वजा केले जाते.
नियमानुसार कोरोना संकटात नोकरी गमावलेल्या औद्योगिक कामगारांना तीन महिन्यांसाठी पन्नास टक्के पगार देण्यात येईल. हा फायदा २४ मार्च ते ३१ डिसेंबर दरम्यान ज्यांनी नोकर्या गमावल्या आहेत त्यांना होणार आहे. पूर्वी ही योजना ३१ डिसेंबर २०२० पर्यंत वाढविण्यात आली होती, परंतु आता त्याचा फायदा जून २०२१ पर्यंत घेता येईल.
हे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत
जरी एखाद्या व्यक्तीने ईएसआयसीचा विमा उतरविला असेल, परंतु काही गैरव्यवहारामुळे त्याला कंपनीतून काढून टाकण्यात आले असेल, त्या व्यक्तीविरूद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे किंवा सेवानिवृत्तीच्या तारखेआधी त्या व्यक्तीने सेवानिवृत्ती (VRS) घेतली असेल तर तो / ती या योजनेसाठी पात्र नसेल, त्यांना या योजनेला लाभ घेता येणार नाही.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी
विमाधारकाने नोकरी सोडण्यापूर्वी किमान २ वर्षे काम केले असावे आणि ईएसआयमध्ये कमीतकमी ७८ दिवस योगदान दिले असावे. नोकरी गेल्यानंतर संबंधित व्यक्तीला ३० दिवसांच्या आत दावा करावा लागतो. यासाठी क्लेम फॉर्म थेट ईएसआयसी शाखा कार्यालयात किंवा ऑनलाईन सादर करता येईल. तसेच आपण ईएसआयसीच्या संकेतस्थळाला भेट देऊन अटल विमा कल्याण योजनेचा फॉर्म डाऊनलोड करू शकता. फॉर्म मिळवल्यानंतर १५ दिवसांच्या आत क्लेमची रक्कम विमाधारकाच्या बँक खात्यात जमा केली जाईल. त्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड नंबरचा वापर केला जाईल.