नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याच दरम्यान राजकारण तापलं असून भाजपा आणि तृणमूलमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष (Dilip Ghosh) यांनी पश्चिम बंगाल मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. मात्र यावेळी भाजपा नेत्याची जीभ घसरलेली पाहायला मिळाली आहे.
दिलीप घोष यांनी ममता बॅनर्जींवर टीका करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला आहे. जय श्रीराम म्हणण्यात ममता बॅनर्जी यांना काय त्रास होतो? असं म्हणत त्यांनी अपशब्दाचा वापर केला आहे. पश्चिम बंगालच्या बनगाव येथील एका जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी असं म्हटलं आहे. "ममता बॅनर्जी यांच्या रक्तात काय आहे? त्या जय श्री राम म्हणू शकत नाहीत. श्रीरामासोबत असं वर्तन का केलं जात आहे" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच आम्ही सत्तेत आल्यावर कार्यकर्त्यांच्या सांडलेल्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाचा बदला घेऊ असा इशाराही दिलीप घोष यांनी दिला आहे.
"हात-पाय तोडून टाकू, नाही तर थेट स्मशानात पाठवू"; भाजपा नेत्याची जाहीर धमकी
दिलीप घोष यांनी याआधीही काही दिवसांपूर्वी एका जाहीर सभेमध्ये तृणमूलच्या कार्यकर्त्यांना थेट हात-पाय तोडण्याची धमकी दिली होती. तसेच कार्यकर्त्यांमध्ये सुधारणा झाली नाही तर त्यांना थेट स्मशानात पाठवू असं म्हटलं होतं. "तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी गुंडगिरी थांबवावी नाही तर त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ. सुधारणा झाली नाही तर अशा कार्यकर्त्यांचे हात, पाय तोडू आणि डोकं फोडल्याशिवाय राहणार नाही. या कार्यकर्त्यांना घरी पाठवण्याऐवजी रुग्णालयामध्ये पाठवू. जर यानंतरही त्यांच्यामध्ये सुधारणा झाली नाही तर थेट त्यांना स्मशानातच पाठवू" अशी धमकी दिलीप घोष यांनी दिली होती.
"कोरोना व्हायरस नष्ट झाला", भाजपा नेत्याचा अजब दावा
दिलीप घोष यांनी याआधीही अनेकदा वादग्रस्त विधानं केली आहेत. कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढ असतानाच देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव संपला, कोरोना व्हायरस नष्ट झाला असं म्हटलं होतं. पश्चिम बंगालमधील हुगळीमध्ये एका रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. रॅलीदरम्यान मोठ्या संख्येने लोक जमा झाले होते. त्यांना संबोधित करताना घोष यांनी हा अजब दावा केला होता. कोरोना व्हायरस नष्ट झाला अशी घोषणा केली. "काहींना या ठिकाणी गर्दी पाहून आजारी पडल्यासारखं वाटत असेल. मात्र ते कोरोनामुळे नाही तर भाजपाच्या भीतीने आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आता संपला आहे. ममता बॅनर्जी विनाकारण लॉकडाऊन लागू करत आहेत. भाजपाने बैठका आणि रॅलींचं आयोजन करू नये यासाठी हे केलं जात आहे" असं दिलीप घोष यांनी म्हटलं होतं.
कोरोनापासून बचावासाठी गोमूत्र प्या - दिलीप घोष
दिलीप घोष यांनी याआधीही असा अजब दावा केला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी लोकांना कोरोनापासून बचावासाठी गोमूत्र पिण्याचा सल्ला दिला होता. "गोमूत्र प्यायल्याने शरीराची व्हायरसशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढते" असं घोष यांनी म्हटलं होतं. घोष यांनी एका बैठकीत लोकांना घरगुती गोष्टींचा उपयोग समजावून सांगितले. त्यावेळी त्यांनी गोमूत्र प्यायल्याने लोकांचं आरोग्य सुधारतं असा दावाही केला. तसेच गाढवं कधीही गायीची महती समजू शकणार नाहीत असं देखील म्हटलं होतं. त्यांच्या या अजब सल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता.