बाकुंरा – पश्चिम बंगालच्या बाकुंरा जिल्ह्यातील सालटोरा इथं भाजपा आमदार चंदना बाऊरी यांनी स्वखर्चाने रस्ता बांधण्यास सुरुवात केली आहे. इतकेच नाही तर डोक्यावर घमेले घेऊन खडी उचलून रस्त्याच्या कामात मदत करतेय. त्यावेळी आमदाराचे पतीही पत्नीला खंबीर साथ देताना दिसले. रखरखत्या उन्हात डोक्यावर माती, खडी घेऊन रस्ता दुरुस्ती केली जात आहे. ममता बॅनर्जी सरकारकडून रस्ता दुरुस्तीसाठी निधी मिळत नसल्याने रस्ता बनवण्यासाठी मी पुढाकार घेतल्याचे आमदाराने सांगितले.
आमदारासोबत स्थानिक लोकांनीही रस्ता दुरुस्तीसाठी पुढे आले आहेत. बाकुंरा जिल्ह्यातील गंगालजलघाटी ते रांगामाटी राजामेलापर्यंत रस्त्याची गेल्या अनेक वर्षापासून दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे आहेत. यावेळी भाजपा आमदाराने रस्ता दुरुस्त करण्याचा निश्चय केला. चंदना बाऊरी यांनी त्यांना मिळणाऱ्या वेतनातून रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी लागणारे सामान खरेदी केले आणि त्याच सामानाने स्वत: आमदाराने खड्डे भरणे सुरू केले. या कामात पती श्रवण बाऊरी यांनीही पत्नीला साथ दिली.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत बांकुरा जिल्ह्यातील सालटोरा विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या गरीब आणि शेतमजूर कुटुंबातील उमेदवार म्हणून चंदना यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. विजयी झाल्यास हा रस्ता आधी बांधून देऊ असे आश्वासन त्यांनी दिले. मात्र भाजपाच्या आमदार असल्याने सत्ताधारी या रस्त्याचे काम करू देत नसल्याचा आरोप चंदना बाऊरी यांनी केला. राज्याचे तृणमूल सरकार अनेक दिवसांपासून या रस्त्याच्या विकासाबाबत बोलत आहे तरीही इथे विकास का होत नाही? ही रक्कम खर्च होऊ दिली जात नसल्याची तक्रार आमदारांनी केली.
भाजपाचं नाटक असल्याचा आरोप
दरम्यान, सत्ताधारी पक्ष टीएमसी आम्हाला निवडणूक आश्वासने पूर्ण करू देत नाही कारण मी विरोधी पक्षाची आमदार आहे असा आरोप आमदार चंदना यांनी केला. त्याचवेळी तृणमूलच्या उपाध्यक्षा निमाई माझी यांनी हे आरोप फेटाळून लावत नाटक करत असल्याचं म्हटलं पथश्रीमध्ये हा रस्ता आम्ही बांधत असून त्यासाठी थोडा वेळ लागेल असं त्यांनी म्हटलं.