कोलकाता : लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. 11 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील 91 जागांसाठी मतदान पार पडले. मात्र, पुढील टप्प्यातील निवडणुकांसाठी सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला जोर धरला आहे. तसेच, या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाल्याने त्यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगात येऊ लागला आहे. यातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सरकारने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरला परवानगी नाकारली आहे. यावरुन पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
काँग्रेसचे वरिष्ठ नेता आणि दार्जिलिंग लोकसभा मतदार संघाचे उमेदवार शंकर मलाकार यांनी सांगितले की, पोलीस ग्राऊंडवर 14 एप्रिलला राहुल गांधी यांचे हेलिकॉप्टर उतरवण्याची परवानगी मागितली होती. मात्र, पोलिसांनी याला परवानगी नाकारली आहे. परिणामी राहुल गांधी यांची सिलीगुडी येथील जाहीर सभा रद्द करावी लागली आहे. सिलिगुडीचे पोलीस आयुक्त बी.एल. मीणा यांनीही राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरला परवानगी नाकारली असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले,' आम्ही त्या ग्राऊंडवर परवानगी नाकरली आहे. काही नियम आहेत, त्यामुळे त्यांना ही परवानगी नाकारण्यात आली आहे. मात्र, याशिवाय त्यांना दुसरा पर्याय आणला नव्हता.'
दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गेल्या फेब्रुवारी महिन्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हेलिकॉप्टरला परवानगी नाकारली होती. परिणामी त्यांनाही जाहीर सभा रद्द करावी लागली होती. सभा रद्द झाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी सभेला जमलेल्या लोकांना चक्क फोनवरून संबोधित केले होते. यापूर्वी भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या हेलिकॉप्टरलादेखील ममता बॅनर्जी यांनी परवानगी दिली नव्हती.