कोरोना महामारीच्या काळात रुग्णांची ऑक्सिजन पातळी कमी होणं ही एक मोठी समस्या निर्माण झाली. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे देखील अनेक रुग्णांचे बळी गेले. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरचं महत्वं वाढलं. त्यासोबतच देशातील ऑक्सिजन प्लांट व व्हेंटिलेटरच्या कमतरतेचा मुद्दा समोर आला. याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील डॉक्टर रामेंद्रलाल मुखर्जी (Dr.Ramendra Lal Mukherjee) यांनी कोरोना रुग्णांसाठी खास 'पॉकेट व्हेंटिलेटर' तयार केलं आहे. यामुळे कोरोना रुग्णांना मोठी मदत होणार आहे.
डॉ. रामेंद्रलाल मुखर्जी आणि त्यांचा आयआयटी कानपूरमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलाला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. मुखर्जी यांची शरीरातील ऑक्सिजनची पातळी ८५ पर्यंत गेली होती, असं त्यांनी स्वत: एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. त्याचवेळी त्यांना व्हेंटिलेटरचं महत्व लक्षात आलं आणि त्यासाठी काहीतरी करण्याचं ठरवलं. कोरोनावर मात केल्यानंतर घरी परतून रामेंद्रलाल मुखर्जी शांत बसले नाहीत. त्यांनी त्वरित कामाला सुरुवात केली आणि जवळपास अवघ्या २० दिवसांत त्यांनी 'पॉकेट व्हेंटिलेटर'ची निर्मिती केली.
‘पॉकेट व्हेंटिलेटर’चं वजन केवळ २५० ग्रॅममुखर्जी यांनी तयार केलेल्या पॉकेट व्हेंटिलेटरचं वजन केवळ २५० ग्रॅम इतकं आहे. ते एकदा चार्ज केलं की ८ तास सुरू राहतं आणि साध्या मोबाईल चार्जरनं देखील ते चार्ज करता येतं. संपूर्ण उपकरणाचे दोन भाग आहेत. पहिला भाग आहे पाव्हर युनिटचा आणि दुसरा माऊथपीस. यात सामान्यस्वरुपात व्हेंटिलेटरसारखाच मास्क असतो. जेव्हा हे उपकरण सुरू होतं तेव्हा व्हेंटिलेटरच्या अल्ट्रा-व्हायलेट चेंबरच्या माध्यमातून हवा शुद्ध केली जाते. शुद्ध झालेली हवा फुफ्फुसांमध्ये पाठवण्यात येते.
रुग्णालयात वापरण्यात येणाऱ्या सीपीएपी किंवा कंटीन्यूअस पॉझिटीव्ह एअरवे प्रेशर मशीनचा पर्याय म्हणून पॉकेट व्हेंटिलेटर वापरता येऊ शकतो, असा दावा डॉ. रामेंद्रलाल मुखर्जी यांनी केला आहे.
आजवर ३० उपकरांचं पेटंट डॉ. रामेंद्रलाल यांच्या नावावरडॉ. रामेंद्रलाल मुखर्जी यांनी आजवर जवळपास ३० विविध उपकरणांचा शोध लावला असून त्याचं पेटंट देखील त्यांच्या नावावर आहे. असं असलं तरी कोरोना महामारीच्या काळात त्यांनी निर्मिती केलेलं 'पॉकेट व्हेंटिलेटर'चं आजवरचं सर्वात उत्तम काम असल्याचं म्हटलं जात आहे. यासोबतच देशातील सर्वोत्तम वैज्ञानिक पुरस्कारानं (२००२) देखील डॉ. रामेंद्रलाल मुखर्जी यांचा सन्मान करण्यात आला आहे.
डॉ. रामेंद्रलाल मुखर्जी यांनी आता पॉकेट व्हेंटिलेटरच्या पेटंटसाठी देखील अर्ज केला आहे. विशेष म्हणजे, अल्ट्रा- वायलेट (यूवी) प्रणालीद्वारे हवा स्वच्छ केली जात असल्यानं यातून ब्लॅक फंगसचाही धोका उद्भवत नाही, असाही दावा करण्यात आला आहे.