'...तरीही केंद्र सरकार कोरोनाची लस देत नाही', ममता बॅनर्जींचा मोदींवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 02:54 PM2021-03-17T14:54:37+5:302021-03-17T15:34:35+5:30
West bengal Assembly Election 2021: 'भाजपा सर्वात मोठी खोटारडी पार्टी आहे. जी देश उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करीत आहे.'
कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी (West bengal Assembly Election 2021) अजून काही दिवस शिल्लक आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेस आणि भाजपा आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. बुधवारी झारग्राममधील रॅलीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारकडून कोरोना लस मिळत असल्याचे सांगत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. (bengal elections mamata benarjee attacks centre government corona vaccine issues)
भाजपा सर्वात मोठी खोटारडी पार्टी आहे. जी देश उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करीत आहे. मी केंद्र सरकारला राज्यात कोरोना लस पाठविण्यास सांगितले, परंतु ही लस त्यांनी पाठविली नाही. कोरोनाची प्रकरणे पुन्हा वाढत आहेत. तरीही केंद्र सरकार आम्हाला लस देखील विनामूल्य देत नाही, असे सांगत ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
याचबरोबर, आम्ही बर्याच दिवसांपासून सांगत आहोत की, आपल्या सर्वांना कोरोनाची लस मोफत मिळेल. पंतप्रधान मोदी यांनीही बिहारमधील जनतेला मोफत लसीबद्दल सांगितले होते. तेथील लोकांना ही लस मिळाली का? असा सवाल ममता बॅनर्जी यांनी केला. तसेच, आपल्या त्यांनी भाषणात रेशन योजनेचा पुनरुच्चार केला, त्यावर निवडणूक आयोगाने आक्षेप नोंदविला आहे. ममता बॅनर्जी यांनी भाजपवर आरोप केले की भाजपाचे नेते हॉटेलमधून जेवण आणतात आणि दलित लोकांच्या घरात जेवणाची चर्चा करतात, हा गरिबांचा अपमान आहे, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.
ममतांचा नरेंद्र मोदींवर निशाणा
भाजपा बंगालमध्ये अराजकता पसरवत असेल तर येथील महिलांना चांगलाच धडा शिकवतील, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत ममता म्हणाल्या की, पंतप्रधान बंगाली स्क्रिप्ट पाहून वाचण्याचा प्रयत्न करतात आणि बांगला बोलण्याचा प्रयत्न करतात. जर मी निवडणुका दरम्यान रुग्णालयातून बाहेर आले नसते तर भाजपने राज्यात लूटमार केली असती. भाजप लोकांनीही माझ्या पायावर हल्ला केला, पण बंगालच्या सर्व महिला आमच्या पाठीशी उभ्या आहेत, असे सांगत ममता बॅनर्जी यांनी भाजपावर निशाणा साधला.