कोलकाता: पश्चिम बंगालमधील शालेय पाठ्यपुस्तकात झालेली घोडचूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. येथील शालेय पाठ्यपुस्तकात 'फ्लाईंग शिख' धावपटू मिल्खा सिंग म्हणून चक्क अभिनेता फरहान अख्तरचा फोटो छापला आहे. त्यामुळे सध्या हा विषय चर्चेचा ठरला आहे. दरम्यान, धावपटू मिल्खा सिंग यांच्या फोटोऐवजी फरहान अख्तरचा फोटो छापल्याचा प्रकार लक्षात येताच अभिनेता फरहान अख्तरने स्वत: याबद्दल ट्विट करत नाराजी व्यक्त केली. तसेच, पश्चिम बंगालच्याशिक्षणमंत्र्यांकडे हा चुकीचा छापण्यात आलेला फोटो बदलण्याचीही विनंती केली आहे. यावर, पश्चिम बंगालचे शिक्षणमंत्री पार्थ चॅटर्जी यांनी सांगितले की, फरहान अख्तर यांनी केलेल्या ट्विटबद्दल माहिती मिळाली असून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, या चुकीबद्दल आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
शालेय पाठ्यपुस्तकात घोडचूक, मिल्खा सिंग म्हणून फरहानचा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 9:47 AM