ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. 2 - महिला सुरक्षेच्या बाबतीत दिल्लीपेक्षाही बंगळुरुमधील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालल्याचं दिसत आङे. 31 डिसेंबरच्या रात्री एमजी रोड आणि ब्रिगेड रोडवर नवीन वर्षाच्या स्वागताचं सेलिब्रेशन करण्यासाठी हजारो लोक जमा झाले होते. यामध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता. रात्री 11 वाजता काही हुल्लडबाजांनी महिलांना हात लावण्यास आणि टिप्पणी करण्यास सुरुवात केली. धक्कादायक बाब म्हणजे परिसरात 1500 पोलीस तैनात असतानाही हा प्रकार घडला. या घटनेचे फोटो समोर आले आहेत, मात्र अद्यापही कोणताच गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
बंगळुरु मिररने दिलेल्या वृत्तानुसार या परिसरात हजारो लोक सेलिब्रेशन करण्यासाठी जमत असतात. पोलिसांनी आपण कोणत्याही परिस्थिती किंवा घटनेचा सामना करण्यासाठी सज्ज असून व्यवस्था करण्यात आल्याचा दावा केला होता. मात्र या घटनेनंतर पोलीस नेमकं कोणाच्या बाजून होती असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.
हुल्लडबाजांनी अर्धी रात्र झाल्यानंतर सगळ्या सीमा पार केल्या आणि महिलांना हवं तिथे स्पर्श करण्यास सुरुवात केली. महिलांचा विनयभंग होत होता. परिस्थिती एवढी बिघडली होती की जमलेल्या तरुणी, महिलांनी सँडल, चपला हातात घेऊन मदतीसाठी धावण्यास सुरुवात केली.
कोणताही गुन्हा नोंद नाही -
घटनेचे फोटो समोर आल्यानंतर तसंत प्रत्यक्षदर्शी असतानाही पोलिसांनी मात्र अजून कोणताच एफआयआर दाखल झालं नसल्याचं सांगितलं आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे उपायुक्त संदिप पाटील यांनी 'महिलांची कुटुंबियांशी चुकामूक झाली होती, त्यांचा शोध लागत नसल्याने मदत मागत होत्या,' असा दावा केला आहे. विनयभंगाचा कोणताच गुन्हा दाखल केला गेला नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
महिलांचे कपडे काढून केला विनयभंग -
सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या पोलिसांनी दिलेली माहिती मात्र वेगळीच आहे. चर्च मार्गावर तैनात एका महिला पोलिसाने 'काही हुल्लडबाजांनी दारुच्या नशेत असलेल्या महिलेचे कपडे काढून तिची छेड काढल्याचं', सांगितलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एमजी आणि ब्रिगेड रोडवर 1500 पोलीस कर्मचारी तैनात होते.