नवी दिल्ली - मिग-21 विमानातून एफ-16 सारखं अत्याधुनिक विमान जमीनदोस्त करणाऱ्या विंग कमांडर अभिनंदन यांचं सध्या सर्वत्र कौतुक सुरू आहे. जवळपास 60 तास पाकिस्तानच्या ताब्यात राहिल्यानंतर मायदेशात परतलेल्या अभिनंदन यांची आकाशाची ओढ कायम आहे. भारतीय हवाईदलाचे धाडसी पायलट अभिनंदन यांची शौर्यगाथा लवकरच शाळेतील पाठ्यपुस्तकातही समाविष्ट होणार आहे. त्यानंतर आता बंगळुरूतील एका कलाकाराने टाईपरायटरच्या मदतीने अभिनंदन यांचा खास फोटो तयार केला आहे.
एसी गुरुमूर्ती असं फोटो तयार करणाऱ्या कलाकाराचं नाव आहे. गुरुमूर्ती यांनी टाईपरायटरने अप्रतिम फोटो तयार करून शूरवीराला अनोखं वंदन केलं आहे. विशेष म्हणजे मॅन्युअल टाईपरायटरच्या मदतीने कॅरेक्टरचा वापर करून अभिनंदन यांचा फोटो तयार केला आहे. 'विंग कमांडर अभिनंदन हे खरे हिरो आहेत. त्यांची शौर्यगाथा प्रेरणादायी आहे' असं एसी गुरुमूर्ती यांनी म्हटलं आहे. अभिनंदन यांचा हा फोटो सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. गुरुमूर्ती यांच्या कलेचं सर्वत्र कौतुक होत आहे.
भारतीय 'एअर स्ट्राईक'ची कथा, शालेय पुस्तकात 'अभिनंदन' यांची शौर्यगाथाभारतीय हवाईदलाचे धाडसी पायलट अभिनंदन यांची शौर्यगाथा आता शाळेतील पाठ्यपुस्तकातही समाविष्ट होणार आहे. राजस्थान सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना लवकरच शौर्याचे धडे गिरवता येणार आहेत. काही दिवसांपूर्वी राजस्थानचे शिक्षणमंत्री गोविंद सिंह डोटासरा यांनी ट्वीट करुन याबाबतची माहिती दिली होती. राजस्थान सरकारने अभिनंदन यांचा सन्मान करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं राजस्थानच्या शिक्षणमंत्र्यांनी म्हटले होते. यासाठी त्यांनी अभिनंदनदिवस असा हॅशटॅगही वापरला होता. कोणत्या इयत्तेतील विद्यार्थ्यांना हा धडा असणार आहे याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
"अभिनंदन तू जे केलंस ते सर्वांनाच शक्य नाही", हवाई दलाचा अभिनंदन यांच्या धाडसाला सलाम!पाकिस्तानच्या एफ-16 लढाऊ विमानाचा पाठलाग करताना अभिनंदन वर्धमान यांचं मिग-21 विमान चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेले होते. विमानाला आग लागल्याने अभिनंदन यांनी पॅराशूटने बाहेर उडी मारली आणि ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये पडले. नंतर त्यांना पकडण्यात आले. भारतील लष्कर, अतिसुरक्षित रेडिओ फ्रिक्वेन्सी (विद्युतचुंबकीय लहरी कंपन) आणि संवेदनशील लॉजिस्टिक (कुमक आणि रसदची व्यूहरचना) ही महत्त्वपूर्ण माहिती काढून घेण्यासाठी पाकिस्तानच्या लष्कराने आटोकाट प्रयत्न केला; परंतु अभिनंदन यांनी पाकिस्तानचा हा मनसुबा मोठ्या हुशारीने आणि खंबीरपणे उधळून लावला.
पाकिस्तानचं एफ-16 लढाऊ विमान पाडल्यानंतर विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी दाखवलेल्या प्रसंगावधान आणि धाडसावर हवाई दलानं स्तुतिसुमनं उधळली आहेत. पोस्टमध्ये लिहिलं आहे की, तू जे केलं अभिनंदन, हे सर्वांनाच शक्य नाही. शिकाऱ्याचीच केली शिकार, हे सर्वच करू शकत नाहीत. एअरफोर्सनं ट्विटरवरून अभिनंदन यांच्यासाठी एक कविताही पोस्ट करण्यात आली होती.
अभिनंदन स्टाइल मिश्यांची धूम, तरुणाईचा नवा आयकॉनदाढी, मिशा काढून ‘स्मार्ट’बनण्याचे प्रमाण हल्ली वाढले होते. ‘अशी ही कशी नाहीशी झाली मिशी?’ असा प्रश्न पडला होता. मात्र, पाकिस्तानी विमानाला हुसकावून लावणारे शूर विंग कमांडर अभिनंदन यांच्यासारखी मिशी, दाढी ठेवण्याची धूम दिल्लीसह देशभरात तरुणांपासून उद्योगपतींपर्यंत उसळली आहे. ‘सोशल मीडिया’तून अभिनंदन यांची छबी एका ‘सुपर ब्रँड’च्या रूपाने पुढे आली आहे. दोन दिवसांपासून त्यांच्याप्रमाणे मिशी कोरण्याचा उत्साह युवकांमध्ये विशेष करून आहे. नेते, अभिनेते आणि माजी सैनिकांनाही अशा मिशीच्या ‘स्टाइल’चे चाहते आहेत. पाकच्या तावडीतून ऐटबाजपणे भारतात परतलेल्या अभिनंदन यांच्या धाडसाबरोबरच मिश्यांचेही कौतुक होत आहे. अनेक युवक अभिनंदन यांच्याप्रमाणे मिशा कोरून घेत असून, सोशल मीडियावर आपली प्रतिमा ‘व्हायरल’करताना दिसतात.
भारतीय हवाई दलानं केलेल्या एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानने दुसऱ्याच दिवशी 27 फेब्रुवारीला भारतीय हद्दीत अमेरिकेने दिलेली एफ 16 ही विमाने घुसवून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय हवाई दलाने हा हल्ला परतावून लावत पाकिस्तानचं एफ 16 हे विमान पाडलं होतं. पाकिस्तानच्या विमानाचा पाठलाग करताना भारताचे मिग 21 हे विमानही पाकिस्तानच्या हद्दीत पडले होते. पायलट अभिनंदन यांना पाकिस्तानने तीन दिवसांनंतर भारताच्या हवाली केले होते.