बंगळुरू: कोरोनाच्या पहिल्या लाटेत मृत्यूमुखी पडलेल्या दोघांचे मृतदेह रुग्णालयाच्या शवागारात कुजून गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. २ जुलै २०२० रोजी मृत्यू झालेल्या दोन व्यक्तींच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांना रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली. त्यानंतर कुटुंबियांनी त्यांच्या धार्मिक रितीरिवाजानुसार श्राद्धाचे विधी केले. मात्र त्यानंचर १६ महिन्यांनी आपल्या आप्तांवर अंत्यसंस्कारच झाले नसल्याची माहिती दोन्ही कुटुंबांना समजली आणि त्यांना मोठा मानसिक धक्का बसला.
कोरोनामुळे ६७ वर्षीय मुनिराजु यांचा २ जुलै २०२० रोजी मृत्यू झाला. बंगळुरूतील ईएसआय रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यावेळी देशात कोरोनाची पहिली लाट होती. मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिले जात नव्हते. त्यामुळे मुनिराजुच्या कुटुंबियांनी बंगळुरू महापालिकेला अंत्यसंस्कार करण्याची परवानगी दिली. मात्र मुनिराजु यांच्यावर अंत्यसंस्कारच झाले नसल्याची, त्यांचा मृतदेह शवागारात कुजल्याची माहिती समजल्यावर कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली.
जवळपास असाच काहीसा प्रकार ४० वर्षांच्या दुर्गा यांच्यासोबतही घडला. त्यांचा मृत्यूदेखील २ जुलै २०२० रोजी झाला. दुसऱ्याच दिवशी त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्याचं सांगण्यात आलं. मात्र मुनिराजु आणि दुर्गा यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार झालेच नव्हते. त्यांचे मृतदेह शवागारातच होते. तब्बल १६ महिने त्यांचे मृतदेह शवागारात राहिले. ते अक्षरश: कुजून गेले. आपल्या कुटुंबातील सदस्यावर अंत्यसंस्कार झाले आहेत, अशी कुटुंबातील इतर सदस्यांची समजूत होती. त्यामुळे त्यांनी श्राद्धाचे विधी उरकून घेतले होते.
दोघांचे मृतदेह शवागारात असल्याची माहिती शनिवारी उघडकीस आली. त्यानंतर रुग्णालयात एकच खळबळ माजली. दोन मृतदेह तब्बल १६ महिन्यांपासून शवागारात कसे राहिले, ते सध्या कोणते स्थितीत आहेत, त्यांची अवस्था काय, याबद्दल अद्याप रुग्णालयानं कोणतीही माहिती दिलेली नाही. रुग्णालयाचा एकही अधिकारी याबद्दल बोलायला तयार नाही.