21 जानेवारीपासून बंगळुरूमधून बेपत्ता असलेला 12 वर्षांचा मुलगा रविवारी अखेर हैदराबाद मेट्रो स्टेशनवर सापडला. व्हाईटफिल्डमधील कोचिंग सेंटरमधून बाहेर पडल्यानंतर मुलगा घरी परतला नाही. गेल्या तीन दिवसांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते, मात्र तो मुलगा पोलिसांच्या नजरेतून पळून जाण्यात यशस्वी झाला. ज्या ठिकाणी तो शेवटचा दिसला होता त्या ठिकाणांना जेव्हाही पोलिसांनी भेट दिली तेव्हा पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचण्याआधीच तो मुलगा दुसऱ्या ठिकाणी निघून जायचा.
डीन्स एकॅडमीचा विद्यार्थी परिनव सकाळी 11 वाजता कोचिंग सेंटरमधून बाहेर पडताना दिसला. येमलूरजवळील पेट्रोल पंपावर दुपारी तीनच्या सुमारास तो दिसला. बंगळुरूमधील मॅजेस्टिक बस टर्मिनसवर संध्याकाळी त्याला शेवटचं पाहिले गेलं. बंगळुरूहून तो आधी म्हैसूर आणि नंतर चेन्नईमार्गे हैदराबादला पोहोचला. त्याच्याकडे 100 रुपये होते आणि जगण्यासाठी त्याने काही पार्कर पेन प्रत्येकी 100 रुपयांना विकले. एका फुटेजमध्ये तो ग्राहकांना पेन विकतानाही दिसत होता.
परिनवच्या पालकांनी सोशल मीडियावर मदतीचे आवाहन केलं. त्यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून मुलाचा शोध घेण्याची मोहीम सुरू केली. यावेळी काही लोक मॅजेस्टिकमध्येही मुलाचा शोध घेण्यासाठी गेले. मुलाच्या आईने एक व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती आपल्या मुलाला परत येण्याचं आवाहन करत आहे. या मुलाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या वेळी हैदराबाद मेट्रो स्थानकावर एका प्रवाशाने मुलाला ओळखलं. मुलाने त्याच्या ओळखीची पुष्टी केली, त्यानंतर त्याला बुधवारी नामपल्ली मेट्रो स्टेशनवर थांबवण्यात आले.
मुलाच्या पालकांना याबाबत माहिती देण्यात आली असून ते हैदराबादला रवाना झाले आहेत. बंगळुरू आणि हैदराबाद या दोन मेट्रो शहरांमधील अंतर 570 किमी आहे आणि गेल्या तीन रात्रीपासून मुलगा बेपत्ता होता. या घटनेबाबत परिनवच्या वडिलांनी सांगितलं की, तो हैदराबादला कसा पोहोचला हे मला माहीत नाही. ते म्हणाले, 'माझ्या मुलाला ओळखणाऱ्या अज्ञात व्यक्तीचे मी आभार मानतो. याच दरम्यान मुलाच्या आईने आणखी एक पोस्ट शेअर करत लोकांचे आभार मानले आहेत.