आजकाल हार्ट अटॅक येण्याच्या अनेक घटना या सातत्याने घडत आहेत. कोणाला एखाद्या कार्यक्रमात नाचताना, कोणाला क्रिकेट खेळताना, कोणाला काम करताना, गप्पा मारताना हार्ट अटॅक आल्याचे व्हि़डीओ समोर आले आहेत. अशातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बस चालवताना ड्रायव्हरला हार्ट अटॅक आला आहे.
सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. कर्नाटकातील बंगळुरू येथे बीएमटीसीचा बस ड्रायव्हर बस चालवत होता. बसमधून प्रवासी घेऊन तो नेहमीप्रमाणे आपली ड्युटी करत होता. याच दरम्यान, ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता बस चालवत असताना ड्रायव्हर नेलमंगला येथून दसनपुराच्या दिशेने जात होता.
यावेळी अचानक ड्रायव्हरला हार्ट अटॅक आला. ४० वर्षीय ड्रायव्हरचं नाव किरण कुमार असं आहे. हार्ट अटॅकनंतर बसवरील ताबा सुटताच ती दुसऱ्या बीएमटीसी बसला धडकली. बस ड्रायव्हरला हार्ट अटॅक आल्याचा व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. बस ड्रायव्हर किरण कुमार यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचं बसवरील नियंत्रण सुटलं.
बसमध्ये उपस्थित असलेले कंडक्टर ओबलेश कुमार यांनी वेळीच बसचा ताबा घेत बस थांबवली. यानंतर सर्व प्रवासी सुखरूप बाहेर पडले. कंडक्टर ओबलेश यांनी किरण यांना जवळच्या रुग्णालयात नेलं. तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी ड्रायव्हरला मृत घोषित केलं. या अपघातात कंडक्टरच्या प्रसंगावधनामुळे प्रवाशांचा जीव वाचला.