बंगळुरू: कर्नाटकच्या बंगळुरूतील एका गुराख्याला वस्तू आणि सेवा करासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. बँक खात्यातून २ कोटी रुपयांचे व्यवहार झाल्यानं ४० लाख रुपयांचा जीएसटी भरण्याची नोटीस गुराख्याला आली आहे. ही नोटीस पाहून गुराख्याला धक्काच बसला. उत्तर बंगळुरूच्या बगलूरच्या चोक्कनहल्ली गावात वास्तव्यास असलेला ई मुनिराजूचं मासिक उत्पन्न अवघं २ हजार रुपये आहे.
मुनिराजू गुराख्याचं काम करतो. दूध विकून तो उदरनिर्वाह चालवतो. महिन्याकाठी त्याला २ हजार रुपये मिळतात. त्यामुळे ४० लाख रुपये भरण्याची नोटीस येताच मुनिराजूला धक्काच बसला. त्यानं बँकेत धाव घेतली. त्यावेळी त्याच्या संमतीशिवाय बँक खात्यातून २ कोटींचे व्यवहार झाल्याचं त्याच्या लक्षात आलं. या प्रकरणी मुनिराजूनं त्याच्या एका कौटुंबिक मित्राविरोधात तक्रार दाखल केली आहे.
लिंगराजपुरममध्ये वास्तव्यास असलेल्या कौटुंबिक मित्रानं कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्यानं आपलं पॅन कार्ड, आधार कार्ड आणि बँक खात्याचा तपशील घेतला होता. त्यानंच आपल्या खात्याचा गैरवापर केल्याचा संशय मुनिराजूला आहे. त्यामुळे बगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'मी आणि माझी पत्नी मिळून एक गाय खरेदी करणार होतो. त्यानंतर व्यवसाय सुरू करण्याचा मानस होता. एप्रिलमध्ये आईच्या एका मैत्रिणीनं (जांसी) सरकारी कर्ज मिळवून देण्याचं आश्वासन दिलं. जांसी भाजी विक्रेती असून तिचा पती व्यवसायिक आहे,' असं मुनिराजूनं सांगितलं.
जांसी आणि माझी आई एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखतात. माझी आई लिंगराजपुरममध्ये भाज्या विकते. जांसीनं मला पॅन कार्ड, आधार कार्डच्या प्रती देण्यास सांगितलं होतं. सोबतच माझ्या पत्नीच्या पॅन कार्ड आणि आधार कार्डच्या प्रतीदेखील घेतल्या होत्या. त्यानंतर जांसीनं कर्जाची प्रक्रिया सुरू असल्याचं सांगितलं. माझ्या मोबाईलवर एक ओटीपी येईल. तो तिला सांगितल्यावर काम होईल, असं तिनं सांगितलं. कर्ज मिळणार असल्यानं मी तिला ओटीपी सांगितला, अशी माहिती मुनिराजूनं दिली.