बंगळुरूच्या भुवनेश्वरी नगर भागात वाढदिवसानिमित्त केक खाल्ल्यानंतर ५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या प्रकरणात आता नवा ट्विस्ट समोर आला आहे. मुलगा आणि त्याच्या आई-वडिलांनी केक खाल्ल्यावर फ्रिजमध्ये ठेवलेलं शिळे अन्न आणि बुरशी आलेले काही पापड खाल्ले होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. याच कारणामुळे त्यांना फूड प्वॉइजनिंग झालं. केकच्या सँपलचा फॉरेन्सिक रिपोर्ट अद्याप आलेला नाही.
मुलाच्या पालकांची प्रकृतीही चिंताजनक असून त्यांनाही आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. मुलाचा मृत्यू नेमका कसा झाला याचा तपास सुरू असल्याचं पोलीस निरीक्षक रवी प्रकाश यांनी सांगितलं. ते म्हणाले की, कुटुंबाने २ ऑक्टोबरला बनवलेलं जेवण ६ ऑक्टोबरला खाल्लं होतं. तसेच बुरशी आलेले काही पापडही त्यासोबत खाल्ले. ज्या मुलाचा मृत्यू झाला आहे त्याने देखील पापड खाल्ला होता.
वृत्तसंस्थेनुसार, अधिकाऱ्याने असंही सांगितलं की, केक खाल्ल्याने मुलाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्या मुलाच्या वडिलांनी सांगितलं की, हा केक इतर अनेक लोकांनी खाल्ला, पण त्यांना कोणतीही अडचण आली नाही. शिळे अन्न आणि जुन्या पापडांसह केकचं सँपल टेस्टिंगसाठी पाठवलं आहे. ज्याचा रिपोर्ट अद्याप आलेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, बलराज हा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. गेल्या रविवारी रात्री एका ग्राहकाने त्याची ऑर्डर रद्द केली, त्यानंतर बलराजने तो केक घरी आणला कारण त्याच्या ५ वर्षांच्या मुलाचाही वाढदिवस होता. केक कापून बलराज आणि त्यांची पत्नी नागलक्ष्मी यांनी वाढदिवस साजरा केला, मात्र सकाळी तिघांचीही प्रकृती खालावली. शेजारी राहणाऱ्या लोकांनी तिघांनाही रुग्णालयात नेलं, मात्र तोपर्यंत मुलाचा मृत्यू झाला होता.