Bengaluru Accident :कर्नाटकच्या बंगळुरूमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. फटाके फोडताना काही तरुणांच्या पैजेमुळे एका तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. आरोपींनी तरुणासोबत पैज लावत त्याला फटाक्यांवर बसण्यास सांगितले होते. मात्र फटाक्याच्या स्फोटानंतर तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा सगळा धक्कादायक प्रकार एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
ही घटना ३१ ऑक्टोबर रोजी बंगळुरुच्या कोननकुंटे पोलीस ठाण्यांतर्गत विव्हर्स कॉलनी येथे घडली होती. फटाके फोडताना शबरिश नावाचा तरुण गंभीर जखमी झाला होता. त्यावेळी घडलेला सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता. या घटनेनंतर शबरिश याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र २ नोव्हेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी कोननकुंटे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.
३१ ऑक्टोबरच्या रात्री फटाके फोडणाऱ्या मद्यधुंद तरुणांनी फटाक्यांच्या वर एक बॉक्स ठेवला आणि शबरिशला त्या पेटीवर बसण्याचे आव्हान दिले होते. शबरिशही दारूच्या नशेत होता आणि जर तो फटाके फुटेपर्यंत डब्यावर बसून राहिल्यास त्याला ऑटोरिक्षा दिली जाईल अशी पैज त्याच्या मित्रांनी लावली. मित्रांनी रिक्षाच्या मागणीवर होकार दिला आणि शबरिशने आव्हान स्वीकारले होते.
यानंतर त्याच्या मित्रांनी फटाका पेटवून शबरिशला पेटीवर बसवले. फटाका फुटल्याने शबरिशचा गुप्तांग चांगलेच जळाले होते. शबरिशला तात्काळ व्हिक्टोरिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र २ नोव्हेंबर रोजी उपचारादरम्यान, त्याचा मृत्यू झाला. व्हिडीओमध्ये शबरिशला फटाके असलेल्या पेटीवर बसून त्याचे मित्र दूर पळून गेले. त्यानंतर फटाक फुटण्याची लांबून वाट पाहू लागले. फटाका फुटल्यानंतर शबरिश खाली कोसळला. तितक्यात त्याचे मित्र त्याच्याजवळ धावून आले.
दरम्यान, कोनानकुंटे पोलिसांनी घटनेच्या संदर्भात गुन्हा दाखल केला असून आरोपी नवीन, दिनकर, सत्यवेलू, कार्तिक, सतीश आणि संतोष यांना अटक केली आहे, अशी माहिती बंगळुरू दक्षिण विभागाचे पोलीस उपायुक्त लोकेश बी जगलासर यांनी दिली.