ऑटोमोबाईल कंपनी टेस्ला आणि मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरसारख्या कंपन्यांचे मालक आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी, इलॉन मस्क यांनी भारतात अधिक चर्चा होत आहे. केवळ चर्चाच नाही तर इलॉन मस्क यांची पूजा केली जात आहे. लोक अगरबत्ती लावून इलॉन मस्क यांच्या फोटोची पूजा करत आहेत. भारतातील टेक सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरूमध्ये हे सर्व घडत आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, अचानक लोकांनी इलॉन मस्क यांची पूजा का सुरू केली आहे? तर जाणून घ्या...
दरम्यान, सेव्ह इंडियन फॅमिली फेडरेशन (SIFF) द्वारे इलॉन मस्क यांच्या पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. बंगळुरू येथील फ्रीडम पार्क येथे ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांच्यासाठी या विशेष 'पूजेचे' आयोजन करण्यात आले. सेव्ह इंडियन फॅमिली फेडरेशन (एसआयएफएफ) ही पुरुषांच्या हक्कांसाठी लढणारी एनजीओ आहे.
इलॉन मस्क यांच्या पूजेबाबत या एनजीओचे म्हणणे आहे की, एसआयएफएफच्या पुरुष कार्यकर्त्यांना सतत कंपनीच्या माजी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून ट्विटरवरून बंदी घातली जात होती. ज्यांनी पुरुषांच्या हक्कासाठी आवाज उठवला, त्यांचे अकाऊंट सर्वात आधी ट्विटरने बॅन केले होते. मात्र, इलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर त्या लोकांना बाहेर काढले आणि आता आपल्या सर्वांना फ्री स्पीचचा अधिकार पुन्हा मिळाला आहे. त्यामुळे इलॉन मस्क यांची पूजा केली जात आहे.
व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरलइलॉन मस्क यांची पूजा करतानाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये कार्यकर्ते बॅनरसह दिसत आहेत. ज्यावर लिहिलेले आहे की पुरुषांचे जीवन महत्त्वाचे आहे आणि पुरुषांना शांततापूर्ण अस्तित्वाचा अधिकार आहे. पूजा करणाऱ्या लोकांनी इलॉन मस्क यांच्या फोटोसमोर अगरबत्ती पेटवली आणि इलॉन मस्कया नमः, इलॉन मस्क की जय... असा जप केला. व्हिडिओ शेअर करताना श्रीमन नरसिंह या ट्विटर युजर्सने लिहिले की, "ट्विटर विकत घेण्यासाठी आणि पुरुषांना त्यांच्या छळाच्या विरोधात त्यांचे मत व्यक्त करण्यास परवानगी देण्यासाठी SIFF मेंबर्स बंगळुरूमध्ये गुरु @elonmusk यांची पूजा करत आहेत."