बंगळुरू : नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्तच्या कार्यक्रमात तरुणीवर झालेल्या विनयभंगाच्या घटनेतील सातपैकी चार जणांना गुरुवारी बंगळुरू पोलिसांनी अटक केली. शहराच्या पूर्व भागातील कम्माण्णाहळ्ळीत विनयभंगाचे प्रकार घडले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बलात्कार घटनेतील मुख्य व्यक्तीला पोलिसांनी ओळखले असून, त्याचे नाव ‘लिनो’ असे आहे. लिनो हा त्याच भागातील असून, तो एका तरुणीचा नियमितपणे पाठलागही करायचा. तो शहरातच बी. कॉमचा विद्यार्थी असून, त्याला अटक झाली आहे. इतर तिघांची नावे अय्यप्पा, राजू आणि चिन्नू आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अय्यप्पाने स्कूटरवर बसून लक्ष ठेवले, तर लिनोने रविवारी पहाटे २.४५ च्या सुमारास मुलीचा विनयभंग करून बलात्कार केला. पीडित मुलगी व तिच्या मैत्रिणीचा लपूनछपून पाठलाग करणाऱ्या टोळक्याचे राजू आणि चिन्नू हे सदस्य आहेत. यापैकी एक जण कुरिअर डिलिव्हरीचे काम करतो, तर दुसरा हॉटेलमध्ये. पीडित मुलगी ही ईशान्य भारतातील आहे. तथापि, या प्रकरणाबाबत माझ्या तोंडी विपर्यस्त विधान घालण्यात आले असून, ते संदर्भाला सोडून असल्याचा दावा कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी गुरुवारी येथे केला.
बंगळुरू बलात्कार; सातपैकी चार आरोपींना अटक
By admin | Published: January 06, 2017 2:24 AM