कर्नाटकातील बंगळुरूमध्ये भीषण जलसंकट पाहायला मिळत आहे. भारताची टेक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरातील अनेक जलसाठे उन्हाळ्यापूर्वीच कोरडे पडले आहेत. कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने याबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर सर्वसामान्यांना पाण्याचे टँकर घेण्यासाठी अनेक पटींनी जास्त दर मोजावे लागत आहे. याच दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर एका व्यक्तीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पाणीटंचाईची ही समस्या सोडवावी असं म्हणत त्यांना टॅग केलं. एवढच नाही तर त्यामागील व्यक्तीने दिलेल्या कारणामुळे ही पोस्ट व्हायरल होत आहे.
ट्विटरवरील पोस्टमध्ये नरेंद्र नावाच्या व्यक्तीने म्हटलं आहे की, "राहुल गांधीजी, कृपया बंगळुरूचं जलसंकट दूर करण्यासाठी प्राधान्याने महत्त्वाची पावलं उचला. बंगळुरूमध्ये आयटी उद्योगात काम करणाऱ्या माझ्या एका मित्राने अलीकडेच त्याचा अनुभव शेअर केला. तो म्हणाला. लग्नासाठी मुलगी शोधत आहे, पण बंगळुरूमध्ये जलसंकटामुळे कोणीही त्याच्याशी लग्न करायला तयार नाही."
बंगळुरूमध्ये तीव्र पाणीटंचाई असताना, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी सोमवारी सांगितलं की, गेल्या तीन-चार दशकांत राज्यात इतका भीषण दुष्काळ पडला नाही. यापूर्वीही दुष्काळ पडला होता, मात्र एवढ्या मोठ्या संख्येने तालुके आम्ही दुष्काळग्रस्त म्हणून कधीच जाहीर केले नव्हते.
ते म्हणाले, जिथे कावेरी नदीच्या पाण्याचा पुरवठा करायचा आहे, तेथे ते पुरवले जात आहे, परंतु बंगळुरूमधील सुमारे 13,900 बोअरवेलपैकी सुमारे 6,900 बोअरवेल्स कार्यरत नाहीत. सरकारने गोष्टी आपल्याकडे घेतल्या आहेत आणि पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरची व्यवस्था केली आहे.