बंगळुरु - व्हॉट्सअॅप हे संवाद साधण्याचं अत्यंत लोकप्रिय माध्यम आहे. या अॅपचे जसे काही तोटे आहेत तसे अनेक फायदे ही आहेत. याच गोष्टीचा प्रत्यय नुकताच बंगळुरुमध्ये आला. एका पाळीव प्राण्यांच्या दुकानातून गायब झालेला एक पोपट केवळ व्हॉट्सअॅपमुळे त्याच्या मालकाला अवघ्या 48 तासांमध्ये परत मिळाला आहे.
बंगळुरूच्या एचएएल बाजारपेठेत प्रदीप यादव यांचं फिन्स फर फेदर नावाचं एक पाळीव प्राण्यांचं दुकान आहे. 27 सप्टेंबर रोजी यादव यांनी दुकान उघडले तेव्हा त्यांना एका पोपटासह 16 पक्षी गायब असल्याचं लक्षात आलं. मात्र चोरांनी पैसे अथवा अन्य महागड्या वस्तूंना हातही लावला नव्हता. तसेच दुकानात असलेले इतर काही पक्षी देखील सुरक्षित होते. यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार गायब झालेला पोपट ‘काँगो ग्रे’ असून त्याची किंमत 50 हजार आहे.
यादव यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली. तसेच त्यांच्या व्यावसायिक पक्षी विक्रेत्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर पक्षी चोरीला गेल्याचा मेसेज पाठविला. पोपटाबाबत काही माहिती मिळाल्यास कळवा असं ही त्यांनी त्यांच्या काही मित्रांना सांगितले. त्यानंतर एका व्यक्तीने यादव यांना तसाच एक पोपट खरेदी केल्याची माहिती व्हॉट्सअॅपवर दिली. या व्यक्तीमार्फत पोलीस पोपट आणि चोरांपर्यंत पोहोचले आणि चोरीला गेलेला पोपट मिळाला. काँगो ग्रे पोपट हा माणसासारखा हुबेहूब आवाज काढत असल्याने त्याला जास्त मागणी आहे.