बंगळुरू - सध्या सगळीकडेच प्रदुषणामुळे वातावरण खराब झालंय. देशातील मुख्य शहरात प्रदुषणाने उच्चांक पातळी गाठली आहे. गेल्या काही दिवसात दिल्लीमध्ये वाढलेलं प्रदुषणही त्यातीलच एक भाग आहे. पण वाढणाऱ्या प्रदुषणाला मनुष्यच जबाबदार आहे आणि आपणच हे प्रदुषण कमी करू शकतो असा विश्वास एका रिक्षा चालकाने व्यक्त केलाय. या रिक्षा चालकाने गेल्या २८ वर्षात एकदाही हॉर्न वाजवला नसल्याचा दावा केलाय. त्याच्या मते, ध्वनी प्रदुषणामुळेही माणसांना खूप त्रास होतो आणि काही चालक विनाकारण हॉर्न वाजवून ध्वनी प्रदुषणात वाढ करत असतात.
बंगळुरूमध्ये राहणारे राजेश हे गेल्या कित्येक वर्षांपासून रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करत आहेत. बंगळुरुमध्येही प्रदुषण वाढलं आहे. पण ते म्हणतात की, देशातील प्रत्येक राज्यातील सगळ्यात वाईट परिस्थिती सध्या ध्वनी प्रदुषणाची आहे. मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढल्याने वायू प्रदुषणासोबतच ध्वनी प्रदुषणाचीही समस्या वाढीला लागलीय. गाड्यांमधून निघणारा हॉर्नचा आवाज हा केव्हा केव्हा मर्यादेपेक्षा जास्त असतो. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सध्यातरी कोणतीच यंत्रणा नाहीए. त्यामुळे दिवसेंदिवस हे ध्वनी प्रदुषण वाढत जाईल, असं राजेश सांगतात.
ते म्हणतात,‘२८ वर्षांपूर्वीच मी हॉर्न वाजवणं सोडून दिलंय. १९८८ साली शेवटचा हॉर्न वाजवला, त्यानंतर आपण विनाकारण हॉर्न वाजवून कित्येकांना त्रास देतोय असं वाटू लागलं आणि हॉर्न वाजवणंच बंद केलं. मी काही वर्ष परदेशात काम केलंय. मोठ्याने हॉर्न वाजवणं म्हणजे विनाकारण दुसऱ्यांवर ओरडण्यासारखं आहे. आपल्याकडे अनेक अंध व्यक्ती प्रवास करत असतात. त्यांना दिसत नसलं तरी त्यांची श्रवणयंत्रणा फार मजबूत असते. त्यांना प्रत्येक लहान लहान आवाजाचा अंदाज येत असतो. आपण अशाप्रकारे हॉर्न वाजवल्याने ते बाचकू शकतात. त्यामुळे विनाकारण हॉर्न वाजवणं सोडून दिलं पाहिजे.’
गरज असेल तिकडे नक्की हॉर्न वाजवावा. पण उगीचच ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर हॉर्न वाजवण्यात काय अर्थ आहे? असं विनाकारण हॉर्न वाजवणाऱ्यांना ते नेहमीच रोखतात. ते याबाबत कोणालाही जबरदस्ती करू शकत नाहीत, मात्र त्यांच्यामुळे एखादातरी चालक सुधारला तरी त्यांना बरं वाटले असं राजेश सांगतात.
सौजन्य - thelogicalindian.com