बंगळुरू : कुत्र्याचं डोकं एका मडक्यात अडकल्याने त्याचा जीव वाचवण्यासाठी तब्बल 15 पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न केले. कसलीही इजा न होता कुत्र्याचं डोकं सुखरुप बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी थोडीशी शक्कल लढविली आणि कुत्र्याची मडक्यातून सुटका केली. बंगळुरूत ही घटना घडली असून आयपीएस अधिकारी अभिषेक गोयल यांनी याबाबत ट्विट करून सांगितलं आहे.
बंगळुरू पोलीस हे नेहमीच नागरिकांच्या कौतुकाच्या पात्रतेस ठरलेले आहेत. केवळ माणसांच्याच समस्या जाणून न घेता मुक्या प्राण्यांनाही त्यांनी कित्येकदा मदत केलेली आहे. असाच एक प्रकार पुन्हा समोर आलाय. दोन दिवसांपूर्वी बंगळुरूत एका कुत्र्याचं डोकं प्लास्टिकच्या मडक्यात अडकल्याची माहिती पोलिसांना मिळाली. कुत्र्याचं तोंड अडकल्याने त्याला धड श्वासही घेता येत नव्हता. तो जिवंत राहावा याकरता त्याने श्वास घेणं गरजेचं होतं, त्यामुळे पोलिसांनी सगळ्यात आधी त्या मडक्याला थोडीशी छिद्र पाडली, जेणेकरून कुत्र्याला निदान श्वासतरी घेता येईल.
आणखी वाचा - नागालँडची अंडर-19 टीम फक्त दोन धावांवर ऑलआऊट, नऊ जण शून्यावर बाद
आणखी वाचा - तोंडात भरपूर स्ट्रॉ कोंबण्याचा गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड या भारतीयाच्या नावे
मडक सहज फुटण्यासारखं होतं, मात्र मडकं फोडताना काळजी घ्यावी लागली कारण जरातरी हयगय झाली असती तर कुत्र्याला इजा पोहोचली असती. त्यामुळे शर्थीचे प्रयत्न करून अगदी सावकाशपणे हे मडकं फोडण्यात आलं. पण हा कुत्रा इतका बिथरला होता की मडक्यातून आपली सुटका होताच त्याने धूम ठोकली, त्यामुळे त्या कुत्र्याचा फोटोच काढता न आल्याची खंत अभिषेक गोयल यांनी त्यांच्या ट्विटमध्ये व्यक्त केलीय.
15 पोलिसांनी आपली ड्युटी सांभाळत या कुत्र्याला जीवनदान दिलं आहे. आयपीएस अभिषेक गोयल यांनी याबाबत ट्वीट करताच अनेक नेटिझन्सने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. गेल्या काही दिवसांपासून पोलिसांविषयी देशभरातून उमटत असलेल्या प्रतिक्रिया पाहता पोलीसही माणूसच आहेत, त्यांच्यातही माणुसकी शिल्लक आहे, अशा प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहे.
अशाच इतर चित्र-विचित्र बातम्यासाठी येथे क्लिक करा.
मडक्यात काहीतरी खायाला मिळेल या आशेने मडक्याजवळ गेलेला कुत्रा स्वतःच मडक्यात अडकला. त्याला श्वासही घेता येत नसल्याने कदाचित त्याचा जीवही गेला असता, मात्र पोलिसांनी दाखवलेल्या समयसुचकतेमुळे कुत्रा वाचला आहे, त्यामुळे पोलिसांचे कौतुक व्हायलाच हवे, असंही काही नेटिझन्स म्हणाले.