इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या महिनाभराहून अधिक काळ युद्ध सुरू आहे. याच दरम्यान, गाझा पट्टीबाबत कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केलेल्या विधानानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ट्रुडो यांना चांगलंच खडसावलं आहे. हमासने इस्रायलवर केलेल्या भीषण हल्ल्यापासून, इस्रायली सैन्य गाझा पट्टीवर, विशेषतः हमासच्या ठिकाणांवर जोरदार बॉम्बफेक करत आहे.
गाझा पट्टीत इस्रायली सैन्याकडून सुरू असलेल्या कारवाईवर भाष्य करताना कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी मंगळवारी सांगितलं की, इस्रायलने हमासविरुद्धच्या युद्धात संयम बाळगण्याची गरज आहे. इस्रायलच्या कृतीवर जगाचं लक्ष आहे. इस्रायलने गाझामधील महिला, लहान मुलं आणि नवजात बाळांची हत्या थांबवली पाहिजे.
नेतन्याहू यांनी ट्रुडो यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया देत इस्त्रायलकडून नसून हमासकडून नागरिकांना जाणूनबुजून लक्ष्य केलं जात असल्याचं सांगितलं. या युद्धाला इस्रायल नव्हे तर हमासला जबाबदार धरले पाहिजे. बेंजामिन नेतन्याहू यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टॅग केलं आहे. हमासने संपूर्ण नरसंहार केला आहे ज्यामध्ये अनेक लोकांचे शिरच्छेद करण्यात आले किंवा जाळण्यात आले असं म्हटलं आहे.
"नागरिकांना इजा होणार नाही याची खात्री करण्यासाठी इस्रायल सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे, हमास नागरिकांना नुकसान पोहोचवण्यासाठी सर्व काही करत आहे" असंही म्हटलं आहे. या युद्ध गुन्ह्यासाठी इस्रायल नव्हे तर हमासला जबाबदार धरले पाहिजे, असंही नेतन्याहू म्हणाले. युद्धामुळे अनेक ठिकाणी परिस्थिती गंभीर आहे.