नवी दिल्ली - भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेचा नवीन विक्रम स्थापन केला आहे. प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाला प्राधान्य देत, गेल्या 11 महिन्यात एकही अपघान न झाल्याची नोंद भारतीय रेल्वे करण्यात आली आहे. 1 एप्रिल 2019 ते 24 फेब्रुवारी 2020 या अकरा महिन्यांच्या कालावधीत रेल्वेचा एकही अपघात झाला नाही. तसेच महत्वाच्या रेल्वे स्थानकावर, किंवा रेल्वे अपघातामध्ये एकाही नागरिकाचा मृत्यू न झाल्याचा दावा रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आला आहे. याबाबत, रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्विट करून माहिती दिली.
भारतीय रेल्वे विभागाकडून प्रवाशांच्या सुरक्षिततेसंदर्भात हा नवीन विक्रम नोंद करण्यात आला आहे. सन 1853 पासून गेल्या 166 वर्षात प्रथमच रेल्वे विभागानं हे महत्वपूर्ण योगदान दिलं आहे. भारतीय रेल्वे विभागाच्या प्रयत्नांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेची महत्वपूर्ण काळजी घेण्यात आली. तसेच, प्रवाशांच्या सुरक्षेलाच प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानुसार, रेल्वे ट्रॅकची देखभाल, रेल्वे ट्रॅकचे आधुनिकीकरण सिग्नल सिस्टीममधील आधुनिक तांत्रिक बदल, सुरक्षिततेसाठी आधुनिक बदलांचा वापर, माडर्न आणि सुरक्षित एलबीएच कोचचा उपयोग. क्रॉसिंग गेट, ब्रॉड गेजमध्येही करण्यात आलेले तांत्रिक बदल आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून घेतलेले निर्णय महत्वाचे ठरले आहेत. यामुळेच गेल्या 11 महिन्यात रेल्वेचा कुठलाही अपघात झाला नसून जिवितहानी नसल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. याबाबत, पियुष गोयल यांनीही समाधान व्यक्त केलं आहे.