पश्चिम बंगाल : पूर्वी जंगल-रानातून भटकताना किंवा काट्याकुट्यातून चालताना हिंस्र प्राण्यांचा त्रास होऊ नये याकरता फटाके फोडले जायचे. हीच पद्धत आजही वापरली जाते. पण आता आपल्या बचावासाठी नव्हे तर प्राण्यांना मारण्यासाठी जंगलात फटाके फोडले जातात किंवा त्यांच्या आगीचे गोळे फेकले जातात. पश्चिम बंगालच्या एका जंगलात धुडगुस घालणाऱ्या हत्तीणीला आणि तिच्या पिल्लाला बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांनी आग लावली, त्यामुळे दोन्ही हत्ती आपला जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले असल्याचा एक फोटो समोर आला आहे. नुकताच घोषित करण्यात आलेला आंतरराष्ट्रीय वन्यजीव प्राणी छायाचित्र स्पर्धा २०१७ मध्ये आगीपासून बचावासाठी जीव तोडून पळणाऱ्या हत्तीण आणि तिच्या पिल्लाच्या फोटोला पुरस्कार मिळालाय. या पुरस्कारानंतर हा फोटो सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल झाला.
विप्लाव हाजरा असं या फोटोग्राफरचं नाव आहे. या फोटोला हेल इज हिअर अशी कॅप्शनही देण्यात आली आहे. पश्चिम बंगालमधील बांकुरा गावातला हा फोटो आहे. या गावात हत्तींनी प्रचंड उच्छाद मांडला आहे. त्यामुळे हत्तींमुळे शेताचे नुकसान होऊ नये याकरता शेतात शिरणाऱ्या हत्तींना बाहेर हाकलवण्यासाठी आगीचे गोळे किंवा फटाके फोडले जातात. या चित्रात दिसल्याप्रमाणे हत्तींवर आगीचे गोळे फेकण्यात आलेले आहेत. खरंतर पश्चिम बंगालमध्ये हत्तींचा वावर नित्याचाच आहे. त्यामुळे इथे पर्यटकही मोठ्या प्रमाणात येत असतात.
यावर्षीच्या मार्च महिन्यात पश्चिम बंगालच्या वन प्राधिकरणाकडून हत्तींपासून सावध राहण्याचे संदेश देण्यात आले होते. हत्ती पाणी, अन्नाच्या शोधात मानवी वस्तीत येत आहेत, त्यामुळे नागरिकांनी खबरदारीने राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. गेल्यावर्षी अशाचप्रकारे हत्तींनी नागरिवस्तीत धुमाकुळ घातल्याने जवळपास २९ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे मानव आणि हत्तींच्या संघर्षात कोणाचाही जीव जाऊ नये म्हणून खबरदारी घेण्याचे आवाहन वन प्राधिकरणामार्फत देण्यात येत होते. मात्र स्थानिक आपल्या जीवाच्या संरक्षणासाठी हत्तींवर आगीचे गोळे फेकत असल्यामुळे हत्तींची संख्या कमी होत असल्यची चिंता व्यक्त करण्यात येतेय.
खरंतर हत्ती आपल्या वस्तीत येत नसून प्राण्यांच्याच जागा आपण लाटल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी जागाच उरली नसल्याने आणि अन्न, पाण्याच्या शोधात ते मानवी वस्तीत येत आहेत. जंगलामध्येही मानवाने नको तेवढ्या प्रमाणात हस्तक्षेप केल्यानेच हत्तींनी धुमाकूळ घातला असल्याचं विप्लाव हाजरा यांचं म्हणणं आहे.
सौजन्य - www.foxnews.com