नवी दिल्ली- व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी आपल्या अदाकारीनं सगळ्यांनाच भुरळ घालणारी प्रिया प्रकाश पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हैदराबादेत तिच्या विरोधात एफआयआर दाखल झाल्यानंतर आता मध्य प्रदेशमधल्या एका भाजपा नेत्यानं प्रिया प्रकाश संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात प्रिया प्रकाशच्या गाण्यावर तात्काळ बॅन लावण्याची मागणी त्या भाजपा नेत्यानं केली आहे. होशंगाबादेतील भाजपाचे नेते संजीव मिश्रा यांनी फेसबुकवर प्रिया प्रकाशसंदर्भात एक पोस्टही टाकली. त्या पोस्टमध्ये भाजपा नेत्यानं लिहिलंय की, ज्या देशात मुलीनं एक डोळा मारल्यानं 24 तासांत 7 लाख फॉलोअर्स होतात. त्या देशातील तरुणांची पकोडो विकण्याचीच लायकी आहे. बोर्डाच्या परीक्षा जवळ आल्यानं प्रिया प्रकाशच्या व्हिडीओवर तात्काळ बंदी घाला, अशी मागणीही त्या भाजपा नेत्यानं केली आहे.
गाण्यातील आक्षेपार्ह शब्दांमुळे तक्रार दाखलअभिनेत्री प्रिया प्रकाशला ज्या गाण्यानं स्टारडम मिळवून दिलं तेच गाणं प्रियासाठी अडचणीचं ठरलं आहे. हैदराबादमधील काही तरुणांनी गाण्यातील शब्दांवर आक्षेप घेत प्रिया प्रकाश व सिनेमाच्या निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. गाण्यातील शब्द धार्मिक भावना दुखावणारे असल्याचं म्हणत मुस्लिम समाजातील तरुणांनी यावर आक्षेप नोंदविला आहे. दोन दिवसांपूर्वी प्रिया प्रकाश सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे चर्चेत आली. तिच्या व्हिडीओने तिला कमालीची लोकप्रियता मिळवून दिली. मल्याळम सिनेमा 'ओरू अडार लव'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या प्रियाच्या सिनेमातील गाण्याच्या एका छोट्याशा गाण्याच्या व्हिडीओमुळे ती रातोरात स्टार झाली. पण आता हेच गाणं प्रियासाठी त्रासदायक ठरतंय. हैदराबादमधील काही तरूणांनी गाण्यातील शब्दांवर आक्षेप नोंदविला आहे. गाण्यावर आक्षेप घेत फलकनुमा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 'आम्हीदेखील या गाण्याचे आणि प्रियाचे चाहते झालो होतो. पण, हे गाणं मल्ल्याळम भाषेत असल्याने आम्ही त्याचा अर्थ इंटरनेटवर शोधला. त्यानंतर आमच्या लक्षात आलं की या गाण्यात असे काही शब्द आहेत, ज्यामुळे आमच्या धर्माचा अपमान होतो. गाण्यातील शब्दांमुळे धार्मिक भावना दुखावल्यानं त्यांनी चित्रपट निर्माते आणि अभिनेत्री प्रिया प्रकाशविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.