नवी दिल्ली : तुम्ही एखाद्या कंपनीची डिलरशीप घेऊन नवीन व्यवसायात उतरण्याचा विचार करीत असाल, तर जरा सावध राहा. कारण वेगवेगळ्या कंपन्यांच्या डिलरशीप तथा फ्रँचाइझी देण्याच्या तसेच डिस्ट्रिब्युटर नेमण्याच्या आमिषाने फसवाफसवीचे उद्योग सध्या देशभर बोकाळले आहेत. यात कोरोनाकाळात नोकरी गमावलेल्या लोकांना प्रामुख्याने गंडवले जात असल्याचे आढळून आले आहे.
फेसबुकवर स्पॉन्सर्ड पोस्टच्या माध्यमातून फसवणुकीचे हे उद्योग केले जात आहेत. नामवंत कंपन्यांच्या नावे फेसबुकवर बनावट पेजेस बनवून रितसर जाहिरात देऊन लोकांना बेमालूमपणे गंडवले जात आहे. आयटीसीसारख्या बड्या कंपन्यांच्या नावेही अशा प्रकारे फसविण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आयटीसीची आशीर्वाद आटा, सनफिस्ट बिस्किटे, बिंगो, यिप्पी इत्यादी उत्पादने लोकप्रिय आहेत. त्यांची डिलरशीप देणे आहे, अशा आशयाची एक पोस्ट कंपनीच्या नावे फेसबुकवर काही भामट्यांनी टाकली आहे.
कंपनीच्या नावे बनावट वेबसाईट उघडण्यात आल्याचेही समोर आले आहे. आयटीसीने त्यावर म्हटले आहे की, आपली www.itcportal.com हीच अधिकृत वेबसाईट असून, इतर वेबसाईट्सपासून लोकांनी सावध राहावे. याप्रकरणी कंपनीने पोलिसांत तक्रारही दिली आहे. इतरही अनेक कंपन्यांच्या नावे अशाच प्रकारे फसवणूक केली जात असल्याचे समोर आले आहे.