नवी दिल्ली : डिजिटल फसवणुकीपासून सावध राहा, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जनतेला दिला. रेडिओवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमात ते बोलत होते. मोबाईल, ई-मेलच्या माध्यमातून आमिषाला बळी न पडता सतर्क राहा, असा सल्लाही त्यांनी दिला. मोदी म्हणाले, अशा गोष्टींमुळे नागरिकांचा मेहनतीचा पैसा लुटला जात आहे. एखादा फोन येतो आणि सांगितले जाते की, आपल्याला अमुक रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. आपण एवढे पैसे द्या आणि अमुक एवढी रक्कम बदल्यात घ्या. काही जण या आमिषाला बळी पडतात. नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केली जाणारी ही लूट आहे. हे नवे तंत्रज्ञान विकासासाठी महत्त्वाचे आहे; पण इथे याचा दुरुपयोग करणारे अधिक आहेत. ही लूट कशाप्रकारे केली जाते याचे उदाहरण देताना मोदी म्हणाले की, एका निवृत्त कर्मचाऱ्याला मुलीचा विवाह करायचा होता. घर बांधायचे होते. एक दिवस त्यांना एक फोन आला की, विदेशातून महागड्या वस्तू आपल्यासाठी आल्या आहेत. सीमा शुल्कासाठी आपल्याला दोन लाख रुपये बँक खात्यात जमा करायचे असल्याचे सांगितले. या व्यक्तीनेही काही विचार न करता आयुष्याची कमाई बँकेतून काढून त्या अज्ञात व्यक्तीला पाठवून दिली. नंतर त्यांच्या लक्षात आले की, आपली फसवणूक झाली आहे. या आमिषाला बळी न पडता सावध राहा, असा सल्ला त्यांनी दिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)>वनीकरणाचे आवाहन जलवायू परिवर्तनासंदर्भात बोलताना संसदेत मंजूर झालेल्या एका विधेयकाचा उल्लेख करून मोदी म्हणाले की, ४० हजार कोटी रुपयांचा निधी राज्यांच्या विकासासाठी आणि विशेषत: वनीकरणासाठी देण्यात येणार आहे. एक चळवळ म्हणून नागरिकांनी वनीकरणाचे काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. काही राज्यात वनीकरणाचे चांगले काम झाले आहे, असा उल्लेखही त्यांनी केला. नावीन्यपूर्ण योजनांसाठी दहा हजार कोटींच्या सरकारच्या योजनेवरही त्यांनी भाष्य केले.>पूरग्रस्तांना मदत करणार पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी राज्यांसोबत काम करणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ते म्हणाले की, काही दिवसांपूर्वी आम्ही पाणीटंचाईमुळे काळजीत होतो. आता काही राज्यांत अतिवृष्टीमुळे पूर आला आहे. आसाम, बिहारसह अन्य राज्यांत पुराचे संकट आले आहे. त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल.
डिजिटल फसवणुकीपासून सावध राहा
By admin | Published: August 01, 2016 1:35 AM