नवी दिल्ली - भारतीय लष्कर अधिका-यांना चिनी आणि पाकिस्तानी सुंदर महिलांच्या जाळ्यात अडकू नका असा अलर्ट गुप्तचर यंत्रणेकडून देण्यात आला आहे. गुप्तचर यंत्रणेने भारतीय सरकारला इशारा देत सावधान राहण्याचा सल्ला दिला आहे. 'सुंदर तरुणी अधिका-यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित महत्वाची गुपित माहिती मिळवू शकतात', असा इशारा गुप्तचर यंत्रणेकडून देण्यात आला आहे. गुप्तचर यंत्रणेचा हा अलर्ट व्हॅलेंटाइन डेच्या आधी आणि पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISI ला भारतीय हवाई दलाची गुप्त माहिती पोहोचवल्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी ग्रुप कॅप्टन अरुण मारवाह यांना अटक केल्याचनंतर आला आहे.
इंटर स्टेट इंटलिजन्स (ISI) या पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला भारतीय हवाई दलाविषयीची गोपनीय माहिती पोहोचविल्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी गुरुवारी ग्रुप कॅप्टन अरुण मारवाह यांना अटक केली आहे. गुप्तचर यंत्रणेच्या एका वरिष्ठ अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, 'चांगल्या दिसणा-या चिनी आणि पाकिस्तानी तरुणी आपल्या सुरक्षा अधिका-यांना हनी ट्रॅपमध्ये फसवू शकतात'. अरुण मारवाह यांच्या अटकेनंतर अलर्ट जारी करत सुरक्षा अधिका-यांना हनी ट्रॅपमध्ये अडकू नका असा आदेशच देण्यात आला आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या चार वर्षांत सुरक्षेशी संबंधित निवृत्त अधिका-यांसोबत एकूण 13 अधिका-यांना पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.
तरुणीचा विश्वास जिंकताना असे अडकले अरुण मारवाह‘तू कुणी तोतया नाहीस आणि भारतीय वायुदलात ग्रुप कॅप्टन आहेस, यावर मी कसा बरे विश्वास ठेवू,’ असा प्रश्न स्वत:ला मॉडेल म्हणवून घेणा-या महिमा पटेलने कॅप्टन अरुण मारवाह यांना फेसबुक चॅटिंग करताना विचारला. सुंदर तरुणीने आपल्याविषयी शंका घ्यावी, हे अरुण मारवाह यांना रुचले नाही. त्यांचा इगोच जणू दुखावला. त्यामुळे तिचा विश्वास जिंकण्यासाठी ते हवाई दलाशी संबंधित अतिमहत्त्वाची माहिती तिला देत ते पाकिस्तानी आयएसआयच्या जाळ्यात अलगद अडकले.
फेसबुक चाललेले चॅटिंग महिमाच्या नावाने आयएसआय एजंट करीत होते. पोलीस आता महिमा पटेल व किरण रंधावा याही फेसबुक अकाऊंटची पडताळणी करीत आहेत. किरण रंधावा या अकाऊंटवरूनही त्यांना अनेक मेसेज आलेले आहेत. मारवाह यांनी मोबाइलमधील मेसेज डिलीट केले असले तरी पोलीस ते मिळवण्याचा प्ऱयत्नात आहेत. पोलीस खात्याकडून फेसबुक व व्हॉट्सअॅपच्या व्यवस्थापनाशी पत्रव्यवहार सुरु केला आहे. चॅटिंगच्या विश्लेषणातून या अधिकाºयाने कोणती माहिती आ़यएसआयला कळविली, हे कळू शकेल. ते मेसेज अधिकाºयाविरोधात पुरावा म्हणून उपयोगी ठरतील.
मारवाह यांनी एका मॉडेलला एक सीम कार्ड खरेदी करुन पाठवले होते. पोलीस या कंपनीच्या सर्व्हिस प्रोव्हायडरकडून माहिती मिळवत आहेत. तसेच महिमा व किरण या फेसबुक अकाऊंटसाठी ज्या मुलींचे फोटो वापरले गेले आहेत, त्यांचाही शोध पोलीस घेत आहेत.