नवी दिल्ली : तुमच्या कारवर लावलेल्या फास्टॅगमध्ये पुरेसे पैसे असूनही केवायसी प्रक्रिया दिलेल्या वेळेत पूर्ण केली नसल्यास ते ३१ जानेवारीनंतर निष्क्रीय करण्यात येणार आहे, असे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) सोमवारी स्पष्ट केले.
टोलनाक्यावर वाहनांची गर्दी वाढू नये तसेच वाहनचालकांच्या वेळेत बचत व्हावी, या उद्देशाने एनएचएआयने एक वाहन एक फास्टॅग योजना सुरू केली आहे. याद्वारे एनएचएआयला एकाच फास्टॅग अनेक वाहनांसाठी वापरणाऱ्यांवर अंकुश आणायचा आहे. देशात सध्या ८ कोटीहून अधिक वाहनधारक (९८ टक्के) फास्टॅगचा वापर करीत आहेत.
एनएचएआयने निवेदनात म्हटले आहे की, रिझर्व्ह बँकेने दिलेल्या निर्देशानुसार फास्टॅगचा वापर करणाऱ्या वाहनधारकांना त्याची केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. एकापेक्षा अधिक वाहनांसाठी फास्टॅगचा वापर यापुढे करता येणार नाही. याबाबत काही अडचणी असल्यास वाहनधारकांनी जवळच्या टोलनाक्यावर किंवा बँकांच्या टोलफ्री क्रमांकांवर संपर्क साधावा.