नवी दिल्ली-
आग्रा येथे एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असून तो नुकताच २३ डिसेंबर रोजी चीनहून परतला होता. भारतात आल्यानंतर या व्यक्तीनं एका खासगी लॅबमध्ये जाऊन कोरोना चाचणी केली होती. या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं कळताच आरोग्य विभागानं संबंधित व्यक्तीचं घर गाठलं आणि सील केलं आहे.
वर्षाच्या अखेरीस अनेक व्यापारी लोक व्यवसायासाठी परदेश दौरा करत असतात आणि असे प्रवासी परतल्यानंतर त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येईल अशी माहिती आग्र्याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण श्रीवास्तव यांनी दिली आहे.
चीनमध्ये सध्या कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. माध्यमांमधील आणि सोशल मीडियातील रिपोर्ट्सनुसार चीनमधील कोरोना स्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचे दावे केले जात आहे. यातच चीनहून परतलेला व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं प्रशासन अलर्ट मोडवर आहे. संक्रमित व्यक्तीचं घर सील करण्यात आलं आहे आणि त्याच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी पुढील तपास केला जात आहे. विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि जनतेच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेणं अत्यावश्यक आहे. संक्रमित व्यक्तीवर सध्या उपचार आणि निरीक्षण केलं जात आहे.
चीनमध्ये निर्बंध उठवल्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याच्या बातम्या समोर आल्यापासून भारत हाय अलर्टवर आहे. पण भारतानं घाबरुन जाण्याचं कारण नसल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. कारण भारतात चीनपेक्षा चांगलं लसीकरण पूर्ण झालं आहे.
विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी, साबण आणि पाण्याने वारंवार हात धुणे, शिंकताना किंवा खोकताना तोंड आणि नाक झाकणे आणि आजारी व्यक्तींशी जवळचा संपर्क टाळणे यासारख्या योग्य स्वच्छता पद्धतींचे पालन करणे आवश्यक आहे. तसंच मास्कचा वापर करणंही अत्यंत महत्वाचं आहे. चीन, जपानमधून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची कोरोना चाचणी भारतातील विमानतळांवर केली जात आहे.