नवी दिल्ली, दि. 25 : भारतीय जनता पार्टीचे राष्टीय अध्यक्ष अमित शहा राज्यसभेची निवडणूक लढविणार आहेत. बुधवारी झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अमित शहा यांच्यासह केंद्रीय वस्त्रोउद्योग मंत्री स्मृती इराणी सुद्धा राज्यसभेची निवडणूक लढविणार आहेत.
गुजरातमध्ये राज्यसभेसाठी तीन जागांसाठी येत्या आठ ऑगस्ट रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणूकीत अमित शाह आणि स्मृती ईरानी यांना उमेदवारी देण्याचा निर्णय भाजपाच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच, मध्यप्रदेशातून राज्यसभेसाठी संपतिया उइके यांनी उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे वरिष्ठ नेता जे.पी. नड्डा यांनी संसदीय बोर्डाच्या बैठकीनंतर सांगितले.
Delhi: PM Narendra Modi and BJP chief Amit Shah leave after BJP Parliamentary board meeting. pic.twitter.com/1xRtQbI7DK
— ANI (@ANI_news) July 26, 2017
दरम्यान, गुजरात (3), पश्चिम बंगाल (6) आणि मध्यप्रदेशमधील (1) राज्यसभेच्या दहा जागांवर सद्या सर्वांचे लक्ष लागलेले आहे. याशिवाय उत्तरप्रदेशातील 2 आणि आंध्रप्रदेशातील एका जागेवरही राज्यसभेची पोटनिवडणूक होणार आहे. तसेच, बसपाच्या प्रमुख मायावती यांनी दिलेला राजीनामा आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या रिक्त जागेवरही पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर व्यंकय्या नायडू यांची एक जागाही रिक्त होईल. पंरतू, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे भाजपाला राज्यसभेची जागा देतील का हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तर,भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे गुजरातमधील राज्यसभेच्या तीनही जागा मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. गुजरातमध्ये काँग्रेसच्या 11 आमदारांनी भाजपासाठी क्रॉस वोटिंग केल्यानंतर अहमद पटेल यांच्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. गुजरात विधानसभेच्या 182 सदस्यात भाजपाचे 123 सदस्य आहेत. राज्यसभेसाठी त्यांचे दोन उमेदवार विजयी होऊ शकतात. काँग्रेसचे 56 सदस्य आहेत. राष्ट्रवादीचे 2 तर जनता दल यूनायटेडचा एक सदस्य आहे. या पक्षांच्या पाठिंब्याने काँग्रेसचा एक सदस्य राज्यसभेसाठी निवडून येऊ शकतो. परंतू, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत रामनाथ कोविंद यांना अतिरिक्त 11 मते मिळाली. तसेच, शंकरसिंह वाघेला यांनी पक्ष सोडला आहे. या घटनांमुळे आता परिस्थिती बदलली आहे. काही बदल होऊ शकतो का याची चाचपणी काँग्रेस करत आहे.