नवी दिल्ली : राजधानी दिल्लीसह भारतातील ९ राज्यांच्या राजधानीसह २९ शहरे भूकंपाच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक असून, ही शहरे भूकंपीय क्षेत्र चार आणि पाच या भूकंपप्रवण क्षेत्रामध्ये (गंभीर ते अतिगंभीर) येतात. यात दिल्ली, पाटणा, श्रीनगर, कोहिमा, पुडुचेरी, गुवाहाटी, गंगटोक, शिमला, डेहराडून, इम्फाळ आणि चंदीगडचा समावेश आहे. या शहरांची एकूण लोकसंख्या ३ कोटींपेक्षा अधिक आहे.भारतीय मानक विभागाने देशातील विविध भागांतील भूकंपप्रवण क्षेत्रात आजवर झालेले भूकंप, भूविवर्तन हालचाली, नुकसानीच्या आधारे दोन ते पाच अशी भूकंपप्रवण क्षेत्रे वर्गीकृत केली आहेत, असे राष्टÑीय भूकंपशास्त्र केंद्राचे संचालक विनित गौहलत यांनी सांगितले.यातील बव्हंशी क्षेत्र हिमालयीन पट्ट्यात असून, हिमालयीन पट्टा हे जगातील भूकंपाच्या दृष्टीने सर्वाधिक सक्रिय क्षेत्र आहे.भूकंपाची तीव्रता किंवा भूकंपाची संवेदनशीलतेच्या दृष्टीने विविध शहरांचे वर्गीकरण करणारे राष्टÑीय भूकंपशास्त्र केंद्र भारतीय हवामानशास्त्र विभागांतर्गत येते. सौम्य ते तीव्र भूकंपाच्या क्षमतेनुसार भूकंपप्रवण क्षेत्रांचे वर्गीकरण केले जाते.भूकंपप्रवण क्षेत्र दोन म्हणजे या भागात भूगर्भातील हालचाली कमी प्रमाणात होत आहेत. भूकंपप्रवण क्षेत्र-५ हा भाग सर्वाधिक सक्रिय असतो. क्षेत्र चार आणि पाच भूकंपप्रवण भाग गंभीर ते अतिगंभीर श्रेणीत येतो.भूकंपप्रवण क्षेत्र पाचमध्ये ईशान्येकडील प्रदेश, जम्मू- काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, कच्छचे रण (गुजरात), उत्तर बिहार तसेच अंदमान आणि निकोबार बेटांचा समावेश आहे.भूकंपप्रवण क्षेत्र पाचमध्ये जम्मू- काश्मीर, दिल्ली, सिक्कीम, उत्तर प्रदेशाचा उत्तरेकडील भाग, पश्चिम बंगाल, गुजरात आणि महाराष्टÑाचा काही भाग येतो. २००१ मध्ये भूजमध्ये झालेल्या विध्वंसक भूकंपात २० हजारांहून अधिक लोक ठार झाले होते.चंदीगड, अंबाला, अमृतसर, लुधियाना आणि रूरकी भूकंपप्रवण चार आणि पाच या क्षेत्रात येतात. ऊर्ध्व आसाम ते जम्मू- काश्मीरपर्यंत हिमालयीन पर्वतराजी विस्तारलेली आहे. भूकंपदृष्ट्या हिमालयीन पर्वतराजीत भूगर्भीय हालचालींचे प्रमाण अधिक असते. गंगेच्या खोºयातील भारतीय शहरे हिमालयीन पट्ट्यात येत असल्याने याठिकाणी भूगर्भात सारख्या हालचाली होत असतात. पुढील वर्षी मार्चपर्यंत भारतात ३१ नवीन भूकंप वेधशाळा स्थापन होतील. सध्या भारतात अशा ८४ वेधशाळा आहेत, असे भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. राजीवन यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
भारतातील २९ शहरांना भूकंपाचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 2:57 AM